Nana Patole : राहुल गांधीना मंदिरात प्रवेश नाकारणारे हे कोण? पटोलेंचा सरकारला सवाल | पुढारी

Nana Patole : राहुल गांधीना मंदिरात प्रवेश नाकारणारे हे कोण? पटोलेंचा सरकारला सवाल

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधी सध्या आसाममध्ये आहेत. आसाममध्ये संत श्रीमंत शंकरदेव यांचे जन्मस्थान बटाद्रवा थान येथे मंदिरात जाण्यापासून रोखले जात असल्याचा आरोप त्यांनी माध्यमांशी बोलताना केला. मंदिर समितीने मात्र त्यांना दुपारी ३ नंतर भेट देण्यास सांगितले आहे. या प्रकरणी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्वीट करत सरकारवर निशाणा साधला आहे. (Nana Patole)

Nana Patole : पहारा लावणारे हे कोण ?

राहुल गांधी यांनी आसाममधील संत श्रीमंत शंकरदेव यांचे जन्मस्थान बटाद्रवा थान येथे मंदिरात जाण्यापासून रोखल्यानंतर नाना पटोले यांनी आपल्या ‘X’ खात्यावर पोस्ट करत म्हटलं आहे की,”आसाममध्ये आज ‘भारत जोडो न्याय यात्रा’ सुरू आहे. राहुल गांधी आज सकाळी मंदिरात जाणार होते. त्यांचे मंदिर दर्शन आधीच ठरलेले होते; पण भाजप सरकारने पोलीस तैनात करून त्यांना मंदिरात जाण्यापासून रोखले. राहुल गांधींना मंदिरात जाण्यापासून का रोखले जात आहे? इतरांच्या आस्थेवर पहारा लावणारे हे कोण ?”

काय आहे प्रकरण?

काँग्रेसकडून भारत जोडो न्याय यात्रा राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येत असून ती आसामच्या नागाव जिल्ह्यात पोहोचली आहे. येथील बटाद्रवा ठाण परिसरात संत श्रीमंत शंकरदेव यांचे जन्मस्थान आहे. नियाेजित कार्यक्रमानुसार राहुल गांधी आज शंकरदेव मंदिरात जाणार होते, मात्र माध्यमांशी बोलताना राहुल गांधींनी आरोप केला आहे की, आज त्यांना मंदिरात जाण्यापासून रोखले जात आहे. आम्हाला मंदिरात जायचे आहे. मी काय गुन्हा केला आहे की, मी मंदिरात जाऊ शकत नाही? असा सवालही त्यांनी केला.
मंदिराच्या व्यवस्थापन समितीने रविवारीच राहुल गांधींना सोमवारी दुपारी ३ नंतर येण्याची माहिती दिली होती. व्यवस्थापकीय समितीचे प्रमुख जोगेंद्र देव महंत म्हणाले की, ‘राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानिमित्त अनेक संस्थांनी मंदिर परिसरात भक्ती कार्यक्रम आयोजित केले आहेत. यावेळी मोठ्या संख्येने लोक मंदिरात येणार आहेत, त्यामुळे राहुल गांधी यांना दुपारी ३ नंतर मंदिरात येण्यास सांगण्यात आले आहे.

हेही वाचा 

Back to top button