उदयनराजेच मालक; कोणाला ठेवायचे निर्णय त्यांचाच; फडणवीसांचे उमेदवारीचे स्पष्ट संकेत | पुढारी

उदयनराजेच मालक; कोणाला ठेवायचे निर्णय त्यांचाच; फडणवीसांचे उमेदवारीचे स्पष्ट संकेत

कराड; पुढारी वृत्तसेवा : आपली ही रणजीची टीम आहे, तुम्ही त्याचे कॅप्टन आहात. मात्र, आम्हाला तुमच्या टीममध्ये घ्या राखीव ठेवू नका, अशी गुगली खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टाकल्यावर ‘महाराज, आपली टीम रणजीची नाही, आयपीएलची आहे, तुम्ही या टीमचे मालक आहात, कोणाला आत घ्यायचे, कोणाला बाहेर ठेवायचे हा निर्णय तुम्ही घेणार आहात, आम्हाला तेवढे ठेवा, असा गगनचुंबी षटकारच फडणवीसांनी लगावला. यातून दिवसभर खा. उदयनराजेंना आपल्या सोबत ठेवणार्‍या फडणवीसांनी एकप्रकारे उदयराजेंच्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीचे संकेतच दिले.

बुधवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कराडमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सवास प्रारंभ झाला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना चिमटे काढले. त्याचबरोबर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील जवळीकही सर्वांना पहावयास मिळाली.

कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी डॉ. अतुल भोसले, डॉ. सुरेश भोसले यांचे या महोत्सवाच्या आयोजनाबद्दल कौतुक केले. त्याचबरोबर व्यासपीठावरील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून उदयनराजे म्हणाले ‘आपली ही रणजीची टीम आहे. या रणजी टीमचे आपण कॅप्टन आहात, या टीममध्ये आम्हालाही घ्या. आम्हाला टीमबाहेर ठेवू नका. कोणाला आत घ्यायचे, कोणाला बाहेर ठेवायचे हेे मी तुम्हाला सांगेन. पण सर्वांनाच आत घ्या हे सर्व तज्ञ आहेत, अशी गुगली उदयनराजेंनी फडणवीसांना टाकली. उदयनराजेंची ही गुगली लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने होती. फडणवीसांनी त्यावर ओपनिंगलाच षटकार मारला.

संबंधित बातम्या

खा. उदयनराजे भोसले यांच्या भाषणातील धागा पकडत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणास सुरुवात केल्यानंतर लगेचच खा. उदयनराजे भोसले यांचे नाव घेत ‘महाराज, ही रणजी टीम नसून आयपीएलची टीम आहे. आपणच या टीमचे मालक आहात. त्यामुळे या टीममध्ये कोणाला आत घ्यायचे आणि कोणाला बाहेर ठेवायचे? याचा निर्णय आपणच घेणार आहात, आम्हाला या टीममध्ये ठेवा, असे म्हणत षटकारच खेचला. या कार्यक्रमावेळी खासदार उदयनराजे भोसले व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे व्यासपीठावर दिलखुलासपणे गप्पा मारतानाही पहावयास मिळाले. त्यामुळेच सध्यस्थितीत राज्यसभेवर प्रतिनिधित्व करणार्‍या खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनाच सातारा लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून उमेदवारीबाबत झुकते माप मिळेल, अशी चर्चा सुरू झाली आहे.

Back to top button