परभणी : गंगाखेड शहराच्या मुख्य बाजारपेठेतील दोन दुकाने जळून खाक | पुढारी

परभणी : गंगाखेड शहराच्या मुख्य बाजारपेठेतील दोन दुकाने जळून खाक

परभणी : पुढारी वृत्‍तसेवा गंगाखेड शहरातील डॉक्टर लाईन या मुख्य बाजारपेठेतील मयूर ड्रायक्लिनर्स व बालाजी फर्निचर ही दोन्ही दुकाने आज (बुधवार) पहाटे २ ते ३ वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीत जळून भस्मसात झाली. यामध्ये दोन्ही दुकानाचे साधारणतः ३० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, शहरातील डॉक्टर लाईन बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर असलेल्या शेटे कॉम्प्लेक्स मधील व्यापारी बंडू प्रभाकर वाघमारे यांचे मयूर ड्रायक्लीनर्स व अरविंद पांडुरंग साळवे यांचे बालाजी फर्निचर हे दोन्ही दुकाने बुधवारी पहाटे २ ते ३ वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीत जळून भस्मसाथ झाली. पहाटे ४ वाजता सफाई कामगार मुख्य रस्त्यावर झाडझुडीचे काम करत असताना त्यांच्या निदर्शनास ही बाब आली. यानंतर बालाजी फर्निचरचे व्यापारी अरविंद साळवे यांचे छोटे बंधू भारत साळवे हे पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास नगर पालिकेचे अग्निशामक दल तत्काळ घेऊन घटनास्थळावर पोहोचले. तसेच जी-७ शुगर कारखान्याचे अग्निशामक पथकही तातडीने आगीच्या ठिकाणी पोहोचले.

कापड व फर्निचरचे साहित्‍य असल्‍याने आगीचा मोठा धोका होता. मात्र गंगाखेड नगर पालिका व जी-७ शुगर कारखान्याच्या अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळवल्‍याने मोठी दुर्घटना टळली. परंतु आग पहाटे २ ते ३ च्या सुमारास लागल्याने मयूर ड्रायक्लीनर्स व बालाजी फर्निचर या दोन्ही दुकानातील कापड व फर्निचर तसेच बॉयलर मशिनरीज पूर्णपणे जळून खाक झाल्या होत्या.

दरम्यान पहाटे ५ वाजल्यापासून आग विझवण्यासाठी नगर पालिका तसेच स्थानिक नागरिकांनी मोठ्या शर्तीचे प्रयत्न केले. हातावर पोट असलेल्या मयूर ड्रायक्लीनर्सचे व्यापारी बंडू वाघमारे एक ते दीड हजार ग्राहकांचे कपडे, बॉयलर मशीन जळून खाक झाल्याने साधारणत: १५ लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर बालाजी फर्निचरचे व्यापारी अरविंद साळवे यांच्या दुकानातील फर्निचर व मशिनरीज पूर्णपणे जळून खाक झाल्याने साळवे यांचेही १३ ते १४ लाख रुपये नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

मोठी दुर्घटना टळली

डॉक्टर लाइन हे शहरातील व्यापार पेठेतील मुख्य ठिकाण आहे. जळून खाक झालेल्या दोन्ही दुकाना लगतच शेटे सॉ मील, एचडीएफसी बँक, रेडीमेड कापड अशी दुकाने आहेत. मात्र सुदैवाने आगीचे लोन या ठिकाणापर्यंत न पोहोचल्‍याने मोठी दुर्घटना टळल्याचे यावेळी व्यापाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा : 

Back to top button