महिला खासदाराला महागडे कपडे चाेरणे भाेवले! न्यूझीलंडमध्‍ये नेमकं काय घडले? | पुढारी

महिला खासदाराला महागडे कपडे चाेरणे भाेवले! न्यूझीलंडमध्‍ये नेमकं काय घडले?

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : काही दिवसांपूर्वी न्‍यूझीलंडमधील तरुण महिला खासदाराचा व्‍हिडिओ आपल्‍याकडे तुफान व्‍हायरल झाला. प्रथमच संसदेत प्रवेश केल्‍यानंतर तिने आपल्‍या आदिवासी परंपरानुसार सादर केले गीताचे सर्वत्र कौतुक झाले. आता याचे स्‍मरण यासाठी की, यानंतर आता न्‍यूझीलंडमधील आणखी एक महिला खासदार चर्चेत आली आहे. मात्र याचे कारण पूर्णत: वेगळे आहे. या महिला खासदारवर महागडे कपडे चोरल्‍याचा आरोप असून, याप्रकरणी त्‍यांना राजीनामा द्यावा लागला आहे. नेमकं हे प्रकरण आहे तरी काय? याविषयी जाणून घेवूया…  ( New Zealand’s MP resigns over shoplifting allegations )

कोण आहेत खासदार गहरामन?

न्यूझीलंडमधील ग्रीन पार्टीच्या महिला खासदार गोलरीझ गहरामन या मुळच्‍या इराणच्‍या आहेत. ४२ वर्षीय गोलरिज लहानपणी आपल्‍या कुटुंबासह न्यूझीलंडल्‍या वास्तव्यासाठी आल्या. सुरुवातीला त्याच्या कुटुंबाला निर्वासित म्हणून राहावे लागले; पण नंतर नागरिकत्व बहाल करण्यात आले. गोलरिज या कायद्याच्‍या पदवीधर आहेत. संयुक्त राष्ट्रांची मानवाधिकार वकीलम्‍हणूनही त्‍यांनी काम पाहिले आहे. आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायाधिकरणावरही त्यांनी काम केले होते. न्‍यूझीलंडमध्‍ये २०१७ च्‍या निवडणुकीत त्‍या खासदार झाल्‍या. विशेष म्‍हणजे गहरामन या न्‍यूझीलंडमधील पहिल्‍या निर्वासित खासदार आहेत. ( New Zealand’s MP resigns over shoplifting allegations )

New Zealand’s MP resigns : काय आहे आराेप ?

न्यूझीलंड ग्रीन पार्टीच्या महिला खासदार गोलरीझ गहरामन यांच्‍यावर ऑकलंडमधील एका बुटीक शॉपमधून दोनवेळा महागडे कपडे चोरल्‍याचा तर वेलिंग्टनमधील कपड्यांच्या दुकानात किरकोळ चोरी केल्‍याचा आरोप आहे. तिन्‍ही चोरीचे प्रकार मागील वर्षी घडले होते. आता या प्रकरणी झालेल्‍या मानसिक त्रासाचे कारण देत त्‍यांनी राजीनामा दिला आहे. मात्र या प्रकरणी न्‍यूझीलंडच्‍या नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

मानसिकदृष्ट्या स्वस्थ नसल्‍याचे कारण देत दिला राजीनामा

मला माझ्या मानसिक आरोग्याच्या समस्या लपवायच्‍या नाहती. मी माझ्या कृत्यांची पूर्ण जबाबदारी घेते. याचा मला मनापासून पश्चाताप होत आहे. माझ्या कामाशी संबंधित तणावामुळे माझ्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे. यामुळे मी अशा प्रकारे वागू लागले. मी माझ्या कृत्यांवर माफ करण्याचा प्रयत्न करीत नाही. लोकांनी निवडून दिलेल्‍या प्रतिनिधींकडून उच्च दर्जाच्‍या वर्तनाची अपेक्षा असते. मी कमी पडले. मला माफ करा. यापुढे जगातील सकारात्मक बदलासाठी काम करण्याचे इतर मार्ग शोधण्याचा प्रयत्न करेल, असे स्‍पष्‍ट करत आपण मानसिकदृष्ट्या स्वस्थ नाही. मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी वेळ हवा होता आणि म्हणून राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असल्‍याचे गहरामन यांनी म्‍हटले आहे. मला फक्त आरोप समजून घ्यायचे आहेत. मी बर्‍याच लोकांना निराश केले आहे आणि मला खूप वाईट वाटते, असेही त्‍यांनी नमूद केले आहे.

ग्रीन पार्टीचा गहरामन यांना पाठिंबा

संसदेतील सहा वर्षांच्या कारकिर्दीत गोलरीझ गहरामन यांना अनेकदा दबाव आणि तणावाचा सामना करावा लागला आहे. त्‍यांच्‍यावर सतत दबाव होता, असे ग्रीन पार्टीचे नेते जेम्‍स शॉ यांनी म्‍हटले आहे. तसेच निवडून आल्यापासून त्‍यांना अनेक धमक्यांना सामोरे जावे लागले आहे. पक्ष त्‍यांच्‍यासोबत आहे. त्यांनी राजीनामा देण्‍यासाठी योग्य वेळी, योग्य निर्णय घेतला आहे, असेही शॉ यांनी म्‍हटले आहे.

हेही वाचा :

Back to top button