कझाकस्तानमध्ये सापडले सोन्याचे बकल | पुढारी

कझाकस्तानमध्ये सापडले सोन्याचे बकल

बैकानूर : कझाकस्तानमध्ये पुरातत्त्व संशोधकांनी पंधराशे वर्षांपूर्वीच्या एका मकबर्‍यात सोन्याच्या दोन वस्तू शोधल्या आहेत. त्यामध्ये सोन्याच्या बकलचा समावेश आहे. या बकलवर सिंहासनावर बसलेल्या एका व्यक्तीची प्रतिमा कोरलेली आहे. या वस्तू व मकबरा तुर्की भाषा बोलणार्‍या लोकांच्या ‘गोकतुर्क’च्या काळाची वैशिष्ट्ये दर्शवणारा आहे.

कझाकस्तानच्या इन्स्टिट्यूट ऑफ आर्कियोलॉजीमधील पुरातत्त्व संशोधक झैनोला सामाशेव यांनी याबाबतची माहिती दिली. या बकलवर एक सार्वभौम राजा आपल्या सिंहासनावर बसलेला दाखवला आहे, असे त्यांनी सांगितले. त्याच्या दोन्ही बाजूस नोकर बसलेले आहेत. सामाशेव यांनीच या पुरातत्त्वीय उत्खननाचे नेतृत्व केले.

त्या काळातील सत्ताधीशाला पावित्र्याच्या नजरेतूनही पाहिले जात असे. हे या व्यक्तीच्या एखाद्या संतासारख्या पोजमधून दिसून येते असे त्यांनी सांगितले. कझाकस्तानातील चीनशी लागून असलेल्या पूर्वेकडील दुर्गम सीमेलगतच्या भागातील एलेके सॅझी या साईटवर हे उत्खनन करण्यात आले. तिथे कझाकीस्तानची सीमा चीन, मंगोलिया आणि रशियाच्या सैबेरियाशी जुळते.

याठिकाणी सामाशेव आणि त्यांचे सहकारी 2016 पासून संशोधन करत आहेत. सहाव्या शतकातील या गोकतुर्क मकबर्‍यामध्ये एका उच्चभ्रू व्यक्तीचे अवशेष आहेत. तो कदाचित राजकुमारही असू शकतो. तो खागान लोकांच्या आशिना या शाही वंशातील असावा, असे सामाशेव यांना वाटते.

Back to top button