सर्वात मोठी अगरबत्ती रेकॉर्ड बुकमध्ये | पुढारी

सर्वात मोठी अगरबत्ती रेकॉर्ड बुकमध्ये

नवी दिल्ली : अयोध्येतील भव्य राम मंदिरात लवकरच रामलल्लांची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. त्यानिमित्त अवघ्या देशातील लोकांची स्थिती ‘रामरंगी रंगले’ अशी झाली आहे. अनेकांनी या सोहळ्यासाठी आपापले योगदान दिले आहे. त्यामध्ये गुजरातमधील विहाभाई करशनभाई भारवाड यांचाही समावेश आहे. त्यांनी तब्बल 108 फूट लांबीची अगरबत्ती बनवली आहे. ही जगातील सर्वात मोठी अगरबत्ती असून आता तिची नोंद वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडियामध्ये झाली आहे.

गुजरातच्या बडोदा जिल्ह्यातील तरसाली शहरात भारवाड राहतात. त्यांनी बनवलेल्या या अगरबत्तीचे वजन सुमारे 3611 किलो आहे. यामध्ये गुग्गुळ पावडर, कोकोनट पावडर, बारवी, हवन सामग्री पावडर, विविध औषधी फुले व देशी गीर गायीचे शेण तसेच तूप वापरले आहे. ही अगरबत्ती अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी मंदिर येथे ट्रॉलरने नेली जाणार आहे. तिथे ती 22 जानेवारीला रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावेळी प्रज्वलित केली जाईल. वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडियाकडून त्यांना प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरवण्यात आले.

Back to top button