दोघांच्या युद्धात चिमुकले ठरत आहेत ढाल | पुढारी

दोघांच्या युद्धात चिमुकले ठरत आहेत ढाल

शंकर कवडे

पुणे : सप्तपदी चालल्यानंतर सुखी संसार फुलविण्याचे स्वप्न रंगविणारे दाम्पत्य आयुष्यात कुठल्यातरी वळणावर एकमेकांच्या विरोधात उभे ठाकतात. त्यांच्यामधील प्रेमभावना लुप्त होऊन वाद इतके विकोपाला जातात की, अगदी काडीमोड घेण्यापर्यंत परिस्थिती येते. परस्परसंमतीच्या प्रकरणात लग्नाच्या गाठी सहज सुटतातही. मात्र, एकतर्फी प्रकरणात पोटगी, गुन्हा यापर्यंत पती-पत्नीची मजल जाते. अन् त्यानंतर सुरू झालेल्या कौटुंबिक युध्दात पोटच्या चिमुकल्यांचीच ढाल बनवून समोरच्यांवर मात देण्याचा प्रयत्न पती व पत्नींकडूनही सुरू होत असल्याचे धक्कादायक चित्र कौटुंबिक न्यायालयातील प्रकरणांवरून दिसून येते.

आयुष्याच्या साथीदाराकडून अवास्तव अपेक्षा, कुटुंबातील अन्य सदस्य अडसर वाटू लागणे, संशयाचे भूत मानगुटीवर नाचू लागणे किंवा एकमेकांबद्दल पराकोटीचे गैरसमज यातून संसारवेल कोमेजण्यास सुरुवात होते. शतजन्मीचे नाते जपण्याच्या आणाभाका घेणारी दाम्पत्ये एकमेकांकडे न पाहणेच पसंत करतात. परस्परसंमतीच्या प्रकरणात लग्नाच्या गाठी सहज सुटतातही. मात्र, बहुतांश एकतर्फी प्रकरणात पत्नीकडून पतीकडे पोटगी मागितली जाते. याखेरीज, पतीसह त्याच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हेही दाखल करण्यात येतात.

यावेळी, कुटुंबीय नातेवाइकांमध्ये रस्सीखेच सुरू होऊन अपत्यांचा हत्यार म्हणून वापर होण्यास सुरवात होते. न्यायालयात दाखल झालेल्या बहुतांश प्रकरणांमध्ये पोटगीसह गुन्हे टाळण्यासाठी पतीकडून पत्नीकडे मुलांचा ताबा मागण्यात येतो. तर, नवर्‍याचे तोंडही न पाहण्याचा निर्धार केलेल्या पत्नींकडून मुलांशी संबंध तसेच त्यांना न भेटण्याची अट ठेवण्यात येते. याखेरीज, पोटगी देत असतानाही मुलांची भेट घेण्यासाठी आले असता वाद घालणे, मुलाची शाळा आहे, मुलगी आजारी आहे अशी कारणे सांगून बापलेकाची भेट टाळण्याकडेही पत्नीचा कल राहत असल्याचे निरीक्षण वकीलवर्गाकडून नोंदविण्यात येत आहे.

अपत्यांची प्रकरणे प्रलंबित; युवक घेताहेत स्वत: निर्णय

घटस्फोटाच्या प्रकरणात दोन ते बारा वर्षे वयाच्या अपत्यांचा ताबा मागण्याची अनेक प्रकरणे कौटुंबिक न्यायालयात प्रलंबित आहेत. बारा वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या मुलांमध्ये आई किंवा वडिलांसोबत राहण्याचा निर्णय घेण्याची क्षमता विकसित झाल्याने अशा वेळी अपत्येच आपल्या भवितव्याचा निर्णय घेताना दिसून येतात. या वेळी, अनेक पती-पत्नी अपत्याच्या मतास प्राधान्य देत असल्याचे निदर्शनास आले असले तरी हे प्रमाण अत्यल्प आहे.

मुलांचा वापर पोटगी मिळवण्यासाठी हत्यार म्हणून केला जातो ही वस्तुस्थिती आहे. यामध्ये, पती अथवा पत्नी दोघेही मागे राहत नाहीत. दोघेही आपापल्या परीने मुलांचा वापर करत हवे ते साध्य करताना दिसतात. त्यांना मुलांना प्रेम देण्यापेक्षा आपला अहंकार महत्त्वाचा वाटतो. याखेरीज, हार न पत्करता समोरच्याला कमी दाखविणे यावरून त्यांच्यामध्ये रस्सीखेच दिसून येते.

– अ‍ॅड. आकाश मुसळे, माजी सदस्य, पुणे बार असोसिएशन.

मुलांना आई आणि वडील, दोघांच्याही प्रेमाची आवश्यकता असते. मात्र, घटस्फोटाचा मार्ग स्वीकारल्यानंतर मुलांपोटीचे प्रेम धुसर होताना दिसते. न्यायालयात आपली बाजू कमी पडू लागली की, पती-पत्नी दोघांकडूनही मुलांचा पुरेपूर वापर करण्यात येतो. मुलांचा शस्त्र म्हणून वापर करण्यासारख्या प्रकारांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

– अ‍ॅड. प्रथमेश भोईटे, माजी खजिनदार, पुणे बार असोसिएशन.

हेही वाचा

Back to top button