रोहित शर्माला नेतृत्वावरून हटवल्याचे संतप्त पडसाद | पुढारी

रोहित शर्माला नेतृत्वावरून हटवल्याचे संतप्त पडसाद

मुंबई, वृत्तसंस्था : रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर जवळपास चार दिवसांचा कालावधी लोटला असला, तरी या फ्रँचायझीचे चाहते यातून अद्याप सावरलेले दिसून आलेले नाहीत. चाहत्यांचा संताप याउलट वाढतच चालला असून, सोशल मीडियावर याचे सातत्याने पडसाद उमटताना दिसून येत आहेत. या निर्णयाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर तेव्हापासूनच ‘आरआयपी मुंबई इंडियन्स’ असा हॅशटॅग ट्रेंडमध्ये राहिला आहे.

मुंबई इंडियन्सने गत आठवड्यात रोहित शर्माच्या जागी हार्दिक पंड्याला 2024 साठी कर्णधार म्हणून नियुक्त केले आणि अवघ्या आयपीएल क्रिकेट वर्तुळासाठी हा मोठा धक्का ठरला.

मुंबई फ्रँचायझीचे जगभरात प्रचंड चाहते आहेत. सचिन तेंडुलकरने याच संघाचे प्रतिनिधीत्व केले असून, त्यानंतर रोहित शर्माने आपल्या दमदार नेतृत्वाच्या बळावर या संघाला पाचवेळा आयपीएल जेतेपद मिळवून दिले, त्यामुळे या संघाने जगभरातील लोकांची मने जिंकली. मात्र, शुक्रवारी अचानक घेतलेल्या निर्णयामुळे चाहते पूर्ण निराश झाले आहेत. या निर्णयाने रोहित शर्माचा 10 वर्षांचा कार्यकाळ संपला आहे. यामुळे मुंबई इंडियन्सचे चाहते वेगवेगळ्या पद्धतीने निषेध व्यक्त करत आहेत. ट्वीटरवर याबाबत हॅशटॅग ट्रेंडही सुरू झाला आहे.
स्वत: रोहित शर्माने हार्दिकच्या नेतृत्वाखाली खेळण्याची तयारी दर्शवली असली, तरी या संघाच्या चाहत्यांना ही बाब पटलेली नाही, ही वस्तुस्थिती आहे.

रोहित आणि पिवळ्या जर्सीचे कनेक्शन चर्चेत; बद्रिनाथची पोस्ट व्हायरल झाली

चेन्नई सुपर किंग्जचे माजी खेळाडू आणि टीम इंडियाकडून खेळलेले सुब्रमण्यम बद्रिनाथ यांनी ट्वीटरवर एक पोस्ट केली आहे, जी खूप व्हायरल होत आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्जच्या पिवळ्या जर्सीतील रोहित शर्माचा फोटो शेअर केला आहे. मात्र, हा अ‍ॅडिट केलेला फोटो आहे; पण त्याने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, काय तर म्हणजेच त्याला सांगायचे होते की, जर रोहित शर्मा ‘सीएसके’ मध्ये आला तर. ही पोस्ट रोहितच्या चाहत्यांना खूप आवडली आहे. यावर रोहितची पत्नी रितिकानेदेखील इमोजी कमेंट केली आहे.

रितिकाच्या कमेंटवरही सोशल मीडियात चर्चा

चेन्नई सुपर किंग्जने रोहित शर्मासाठी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओवर रोहित शर्माच्या पत्नीने कमेंट केली आहे. या पोस्टच्या कमेंटवर तिने पिवळे रंगाचे हृदय म्हणजेच हार्ट पोस्ट केले. याचा अर्थही ट्वीटरवर वेगळा घेतला जात आहे. काहींनी असेही म्हटले की, रोहित ‘सीएसके’मध्ये येऊ शकतो, हे याचे स्पष्ट संकेत आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत टिपणी अद्याप केली गेलेली नाही.

Back to top button