एसटीची 30 रूपयांत नाश्ता योजना नावालाच | पुढारी

एसटीची 30 रूपयांत नाश्ता योजना नावालाच

प्रसाद जगताप

पुणे : एसटी प्रवाशांना खासगी उपाहारगृहांमध्ये 30 रुपयांत चहा नाश्ता योजना सुरू केली होती. मात्र, सध्या फक्त ती नावालाच असल्याचे समोर आले आहे. ही योजना राबविणे बंधनकारक असतानाही खासगी थांबा असलेले हॉटेल चालक प्रवाशांकडून चहा नाश्त्यासाठी अव्वाच्यासव्वा पैसे उकळत आहेत. शासनाने प्रवाशांना प्रवास करताना कमी दरात चहा-नाश्ता आणि पाण्याची बाटली उपलब्ध व्हावी, याकरिता ’एसटी प्रवाशांना 30 रुपयांत चहा नाश्ता’ ही योजना सुरू केली. मात्र, राज्यभरात असलेल्या एसटीच्या खासगी थांब्यांवर बोजवारा उडाला असून, प्रवाशांकडून अधिकच्या पैशांची मागणी केली जात आहे.

हिवाळी अधिवेशनातही चर्चा

एसटी प्रशासनाकडून 30 रुपयांत प्रवाशांना चहा-नाश्ता उपलब्ध होत नसल्यामुळे नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये लोकप्रतिनिधींनी याकडे अनेकदा लक्ष वेधले. त्याची जोरदार चर्चा झाली. यामुळे एसटी प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

महाव्यवस्थापकांनी काढले पत्र

हिवाळी अधिवेशनात झालेल्या चर्चेमुळे आणि एसटी प्रशासनाला आलेल्या तक्रारींमुळे महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी पत्र काढले आहे. त्यात त्यांनी खासगी थांबा चालकांकडून होणार्‍या प्रवाशांच्या लुटीमुळे महामंडळाची प्रतिमा मलीन होत आहे. खासगी थांबा चालकांना 30 रुपयांत चहा-नाश्ता आणि नाथजल पाण्याची बाटली देणे बंधनकारक आहे. याची अंमलबजावणी व्हायला हवी, असे लिहिले आहे.

पुणे विभागात सात अधिकृत खासगी हॉटेलचे थांबे

  •  सोलापूर रस्त्यावर 3 थांबे
  •  नाशिक रस्त्यावर 2 थांबे
  • कोल्हापूर रस्त्यावर 1 थांबा
  •  दौंड रस्त्यावर 1 थांबा

महिन्यातून दोनवेळा तपासणी बंधनकारक

महामंडळाच्या अधिकृत थांब्यांवर प्रवाशांना 30 रुपयांत चहा-नाश्ता आणि नाथजल पाण्याची बाटली मिळते आहे की नाही, त्याची गुणवत्ता कशी आहे, याची पाहणी विभागीय स्थरावरील अधिकार्‍यांनी महिन्यातून दोनवेळा करावी. जर अधिकृत हॉटेलचालकांकडून नियमांचे पालन होत नसेल, तर तत्काळ त्याच्यावर कडक कारवाई करावी. त्याचा अहवाल मुख्यालयाला सादर करावा, असे आदेश महाव्यवस्थापकांनी दिले आहेत.

पुणे विभागातील अधिकृत खासगी हॉटेलचालकांच्या थांब्यांची आम्ही वेळोवेळी तपासणी करतो. काही चुकीचे आढळल्यास किंवा तक्रार आल्यास हॉटेलचालकावर कारवाई केली जाते.

– सचिन शिंदे, विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी, पुणे विभाग.

हेही वाचा

Back to top button