पुणे लोकसभा पोटनिवडूक : ताकदीने उतरू अन् जिंकू काँग्रेस, भाजपचा दावा | पुढारी

पुणे लोकसभा पोटनिवडूक : ताकदीने उतरू अन् जिंकू काँग्रेस, भाजपचा दावा

पुणे : लोकसभेच्या मध्यावर्ती निवडणुकीच्या तयारीला देशभरात सर्वच राजकीय पक्ष लागलेले असताना, पुणे शहरातील पोटनिवडणूक घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिले. पुणे शहरातील भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी निवडणुकीला सज्ज असल्याचे सांगतानाच ती जिंकण्याचाही दावा केला. भाजपचे खासदार गिरीश बापट यांचे मार्चमध्ये निधन झाल्यानंतर, सहा महिन्यांत पोटनिवडणूक होण्याची शक्यता गृहीत धरीत भाजप आणि काँग्रेसने त्याची तयारी सुरू केली होती. कर्नाटक विधानसभा निवडणुकी सोबत पुण्यातील पोटनिवडणूक होईल, अशी अपेक्षा होती.

त्यानंतर पावसाळा आला. सहा महिने झाल्यावरही निवडणूक झाली नाही. मध्यप्रदेश, राजस्थान यांसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसोबत अन्य राज्यांतील विधानसभेच्या काही जागांची पोटनिवडणूक जाहीर झाली. मात्र, लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुका जाहीर झाल्या नाहीत. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात काहीजणांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्याचा निर्णय आज झाला. कसबापेठ विधानसभा पोटनिवडणूक जिंकली, त्या पद्धतीने पुण्याची लोकसभेची निवडणूकही आम्ही जिंकू, असा दावा काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केला.

ते म्हणाले, पोटनिवडणूक नियमानुसार सहा महिन्यांत होण्याची अपेक्षा होती. न्याय मिळण्यास उशीर होणे म्हणजे ते एकप्रकारे न्याय नाकारण्या सारखेच असते. लोकसभा निवडणुकीची आमच्या आघाडीची तयारी पूर्ण झाली असून, पोटनिवडणूक कधीही घेतली, तरी आम्ही सज्ज आहोत. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले, भाजपने देशात सर्वत्र निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पुण्यातही आमची बूथ पातळीपर्यंतची तयारी झाली आहे. निवडणूक आयोगाने पुण्यातील निवडणूक कधीही घेतली, तरी आम्ही पूर्ण ताकदीने त्यात उतरू आणि मोठ्या मताधिक्याने भाजपच्या उमेदवाराला निवडून आणू.

भाजपतर्फे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी खासदार संजय काकडे, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, पक्षाचे माजी सचिव सुनील देवधर यांनी पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त उच्चशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार माधुरी मिसाळ यांची नावेही चर्चेत आहेत. काँग्रेसतर्फे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, आमदार रवींद्र धंगेकर यांची नावे चर्चेत आहेत. लोकसभेची मध्यावर्ती निवडणूक एप्रिलमध्ये होण्याची शक्यता असून, त्याची आचारसंहिता फेब्रुवारीच्या अखेरीला जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोटनिवडणूक होईल की नाही, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आज सुरू होती.

हेही वाचा

Back to top button