WI vs ENG : पहिल्या टी-20 लढतीत विंडीजचा इंग्लंडला दणका | पुढारी

WI vs ENG : पहिल्या टी-20 लढतीत विंडीजचा इंग्लंडला दणका

ब्रिजटाऊन, वृत्तसंस्था : आंद्रे रसेलने दमदार पुनरागमन केल्यानंतर विंडीजने इंग्लंडविरुद्ध (WI vs ENG) पहिल्या टी-20 सामन्यात 4 गडी व 11 चेंडूंचा खेळ बाकी राखत सहज विजय संपादन केला आणि 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या लढतीत इंग्लंडला सर्वबाद 171 धावांपर्यंत मजल मारता आली. त्यानंतर विंडीजने 18.1 षटकांत 6 बाद 172 धावांसह दमदार विजय संपादन केला. विंडीजने या लढतीत नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. आंद्रे रसेलने गोलंदाजीत 19 धावांत 3 बळी घेतले. तसेच फलंदाजीत 14 चेंडूंत 29 धावांची आतषबाजी करत या विजयात मोलाचा वाटा उचलला.

बार्बाडोसमध्ये खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचे दमदार प्रदर्शन लक्षवेधी ठरले. दोन वर्षांनंतर वेस्ट इंडिज संघात पुनरागमन करणार्‍या आंद्रे रसेलने या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. उत्कृष्ट गोलंदाजीबरोबरच त्याने विस्फोटक खेळीही खेळली. त्याने या मालिकेत जेरोम टेलरचा कमी धावांत जास्त विकेटस् टी-20 मधील विक्रम मोडला. या दोन्ही संघांमधील या मालिकेतील दुसरा सामना आज ग्रेनाडा येथे होणार आहे. याआधी एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडिजने इंग्लंडचा 3-1 असा पराभव केला होता.

येथे मंगळवारी उशिरा खेळवण्यात आलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. फिलिप सॉल्ट आणि कर्णधार जोस बटलर यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. उभयतांनी 77 धावांची सलामी दिली. सॉल्ट बाद झाल्याने इंग्लिश संघाला पहिला धक्का बसला. त्याला रसेलने हेटमायरकरवी झेलबाद केले. सॉल्टला 20 चेंडूंत 6 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 40 धावा करता आल्या.

विल जॅक नऊ चेंडूत दोन षटकारांच्या मदतीने 17 धावा करून बाद झाला. बेन डकेटने 14 धावा केल्या. कॅप्टन बटलरला होसेनने झेलबाद केले. तो 31 चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 39 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. लियाम लिव्हिंगस्टोनने 19 चेंडूंत एक चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 27 धावांची खेळी केली. सॅम कुरेन 13 धावा करून बाद झाला, तर रेहान अहमद एक धावा काढून बाद झाला.

आदिल रशीद आणि टायमल मिल्स यांना खातेही उघडता आले नाही. वेस्ट इंडिजकडून रसेल आणि अल्झारी जोसेफ यांनी प्रत्येकी तीन विकेटस् घेतल्या. तर रोमारियो शेफर्डने दोन गडी बाद केले. अकेल होसेन आणि जेसन होल्डरला प्रत्येकी एक विकेट मिळाली.

विंडीजचीही खराब सुरुवात (WI vs ENG)

172 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणार्‍या वेस्ट इंडिज संघाला पहिला धक्का ब्रँडन किंगच्या रूपाने बसला. 12 चेंडूंत दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 22 धावा करून तो बाद झाला. तर, काईल मेयर्सने 21 चेंडूंत चार षटकारांसह 35 धावांची खेळी केली. शाय होपने 30 चेंडूंत दोन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 36 धावांची खेळी केली. निकोलस पूरनला 12 चेंडूंत 13 धावा करता आल्या. कर्णधार रोव्हमन पॉवेल 15 चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद 31 धावा आणि आंद्रे रसेल 14 चेंडूंत दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद 29 धावा करून नाबाद राहिला. इंग्लंडकडून वोक्सने एक विकेट घेतली. तर रेहान अहमदने तीन आणि लिव्हिंगस्टोनने दोन गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक

इंग्लंड : 19.3 षटकांत सर्वबाद 171 (फिल सॉल्ट 20 चेंडूंत 40, जोस बटलर 31 चेंडूंत 39, लियाम लिव्हिंगस्टोन 19 चेंडूंत 27. अवांतर 16. आंद्रे रसेल 19 धावात 3 बळी, अल्झारी जोसेफ 54 धावांत 3 बळी, रोमारिओ शेफर्ड 22 धावांत 2 बळी).

विंडीज : 18.1 षटकांत 6 बाद 172 (शाय होप 30 चेंडूंत 36, काईल मेयर्स 21 चेंडूंत 35, रोव्हमन पॉवेल 15 चेंडूंत नाबाद 31. आंद्रे रसेल 14 चेंडूंत 29. रेहान अहमद 3-39, आदिल रशिद 2-25, ख्रिस वोक्स 1-15).

Back to top button