Yashomati Thakur : शासनाला बेरोजगारांची फौज निर्माण करायची आहे का? : यशोमती ठाकूर | पुढारी

Yashomati Thakur : शासनाला बेरोजगारांची फौज निर्माण करायची आहे का? : यशोमती ठाकूर

अमरावती, नागपूर, पुढारी वृत्तसेवा : राज्यात गेल्या दहा वर्षांपासून दीड लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने नोंदणी न केल्यामुळे बेरोजगार आहेत. तर दुसरीकडे सरकार राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना कमी करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे राज्य शासन राज्यात बेरोजगारांची फौज निर्माण करू पाहते आहे का? असा सवाल काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज विधानसभेत उपस्थित केला. Yashomati Thakur

राज्यात २०१४ पासून आतापर्यंत सुमारे दीड लाखापेक्षा अधिक वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान शिक्षण अभ्यासक्रमाचे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. मात्र, राज्य पॅरामेडिकल कौन्सिलने अद्याप या विद्यार्थ्यांची नोंदणी देखिल केलेली नाही. त्यामुळे हे हजारो विद्यार्थी बेरोजगार झाले आहेत, असा आरोप ठाकूर यांनी लक्षवेधी दरम्यान सभागृहात केला. राज्यातील अनेक महाविद्यालये ही महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिलच्या माध्यमातून नोंदणीकृत नाहीत. शासकीय सेवेमध्ये काम करताना वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान शिक्षण अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची नोंदणी होणे अत्यंत गरजेचे असते. मात्र, ही नोंदणी अद्यापही ठप्पच आहे. Yashomati Thakur

यापैकी अनेक विद्यार्थी जेव्हा नोंदणीसाठी पॅरामेडिकल कौन्सिलला दूरध्वनीद्वारे संपर्क साधतात, तेव्हा महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिलकडून विद्यार्थ्यांचे फोनही घेतले जात नाहीत. त्यामुळे सर्व विद्यार्थी त्रस्त आणि हवालदिल झाले आहेत. जोपर्यंत या विद्यार्थ्यांची नोंदणी अधिकृतरित्या होत नाही. तोपर्यंत त्यांना रोजगार मिळणार नाही. असे हजारो विद्यार्थी आज रोजगाराविना आहेत. तर दुसरीकडे राज्य सरकार राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जे कंत्राटी कामगार नेमले गेले आहेत. त्यांना सुद्धा कमी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे राज्य सरकारला राज्यात बेरोजगारांची फौज या निमित्ताने निर्माण करायची आहे का? असा सवाल आमदार यशोमती ठाकूर यांनी विधानसभेत केला. राज्यातील या बेरोजगार युवकांच्या प्रश्नांना न्याय द्यायचा असेल, तर सरकारने ताबडतोब पॅरामेडिकल विद्यार्थ्यांच्या नोंदणीला सुरुवात केली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

Yashomati Thakur आरोग्यमंत्र्यांनी दिले तोडगा काढण्याचे आश्वासन

राज्य सरकारच्या समन्वयाच्या अभावाचा फटका या विद्यार्थ्यांना बसतो आहे. राज्य सरकारच्या उच्च आणि तंत्रशिक्षण वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य या तीनही विभागांनी एकत्र बैठक घेऊन या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर ताबडतोब तोडगा काढावा, अशी मागणी ॲड. ठाकूर यांनी यावेळी केली. या संदर्भात उत्तर देताना राज्याचे आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी लवकरात लवकर यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही सभागृहात दिली.

हेही वाचा 

Back to top button