गरीब, महिला, युवा, शेतकरी यांना बळकट करणार : पंतप्रधान मोदी | पुढारी

गरीब, महिला, युवा, शेतकरी यांना बळकट करणार : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : गरीब, महिला, युवा, शेतकरी हीच माझ्यासाठी मोठी जात असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
विकसित भारत संकल्प यात्रेत ते व्हर्च्युअली बोलत होते. याप्रसंगी त्यांनी जनधन औषध केंद्रांची संख्या 10 हजारांवरून 25 हजार केली. यावेळी ते म्हणाले की, माझ्यासाठी गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी ही सर्वात मोठी जात आहे. त्यांना बळकट करून आम्ही भारताला विकसित राष्ट्र बनवू. आमची स्त्री शक्ती, आमची युवा शक्ती, आमचे शेतकरी आणि आमची गरीब कुटुंबे हे आमचे अमृतस्तंभ आहेत.

गावातील दीदींना ड्रोन दीदी बनवण्याची घोषणा केली होती. मी पाहिले की, काही 10वी पास आहेत, काही 11वी आणि काही 12वी पास आहेत. पण हजारो बहिणी ड्रोन चालवायला शिकल्या आहेत. त्याचा उपयोग शेतीत कसा करायचा, खते आणि औषध फवारणीत कसे वापरायचे, हे सगळं त्यांनी शिकून घेतले आहे. खेड्यापाड्यातील बचत गटांमध्ये काम करणार्‍या दोन कोटी महिलांना लखपती बनवण्याचे माझे स्वप्न आहे, असे मोदी यांनी यावेळी सांगितले. मोदी म्हणाले की, देशातील प्रत्येक नागरिक, मग तो श्रीमंत असो वा गरीब, त्याला स्वस्तात औषधे मिळायला हवीत. लोकांना आजारपणात आयुष्य घालवावे लागू नये. लोकांना शासकीय योजनांचा पुरेपूर लाभ मिळावा, असे आवाहन त्यांनी स्वयंसेवकांना केले.

काय आहे विकसित भारत संकल्प यात्रा?

पीएम मोदींनी झारखंडमधील खुंटी येथून विकसित भारत संकल्प यात्रेला सुरुवात केली होती. याअंतर्गत अनेक ग्रामपंचायतींमध्ये आरोग्य शिबिरे लावणार्‍या व्हॅन धावणार आहेत. ऑन स्पॉट सेवा प्रदान करणे हे याचे उद्दिष्ट आहे. 26 नोव्हेंबर 2023 पर्यंत 995 ग्रामपंचायतींमध्ये 5 हजार 470 आरोग्य शिबिरे घेण्यात आली. यामध्ये 7 लाख 82 हजारांहून अधिक लोक आले होते.

 

Back to top button