पारनेर सैनिक बँक चेक अपहार प्रकरण ; सर्व संशयितांविरुद्ध गुन्हे नोंदविणार | पुढारी

पारनेर सैनिक बँक चेक अपहार प्रकरण ; सर्व संशयितांविरुद्ध गुन्हे नोंदविणार

पारनेर : पुढारी वृत्तसेवा :  पारनेर सैनिक सहकारी बँकेच्या कर्जत शाखेतील सुमारे पावणेदोन कोटी रुपयांच्या धनादेश (चेक) अपहार प्रकरणी सर्व संशयितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश सहकार आयुक्तांनी दिले असून, त्यासाठी जिल्हा लेखापरीक्षकांना प्राधिकृत करण्यात आले आहे. पारनेर सैनिक बँकेच्या कर्जत शाखेत 1 कोटी 79 लाखांच्या चेक अपहार प्रकरणी एक लिपिक व खातेदाराविरुद्ध 8 महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता; मात्र अन्य काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. लेखापरीक्षण झाल्यावर गुन्हे दाखल करू, अशी भूमिका बँक व पोलिसांनी त्या वेळी घेतली होती.

आता चेक अपहार लेखापरीक्षण झाले असून, जिल्हा लेखापरीक्षक राजेंद्र निकम यांनी तो अहवाल सहकार आयुक्त अनिल कवडे यांना सादर केला आहे. त्या अहवालाचे अवलोकन करून कवडे यांनी चेक अपहार प्रकरणात फसवणुकीची जबाबदारी निश्चित करून सर्व संशयितांवर गुन्हे दाखल करावेत यासाठी निकम यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

कर्जत शाखेतील तत्कालीन शाखाधिकार्‍याने कर्मचारी व काही पदाधिकार्‍यांशी संगनमत करून चेक घोटाळा केला आहे. त्याला पाठीशी घालणार्‍या सर्वांवर व काही दोषी संचालकांवर गुन्हे दाखल व्हावेत यासाठी आम्ही न्यायालयात दाद मागू.
                                       – बाळासाहेब नरसाळे, सैनिक बँक बचाव कृती समिती

Back to top button