Kolhapur News : गगनबावड्यात विमान कोसळल्याची अफवा अन् सगळं प्रशासन कामाला | पुढारी

Kolhapur News : गगनबावड्यात विमान कोसळल्याची अफवा अन् सगळं प्रशासन कामाला

राजेश सातपुते

साळवण : गगनबावडा येथील अणदूरच्या जंगलात विमान कोसळल्याची माहिती मिळाली अन् अख्खं प्रशासन कामाला लागले. गुगल मॅपवरील एक फोटो सुद्धा या अफवेसोबत व्हायरल झाल्याने प्रशासनाने मात्र शहानिशा करण्यासाठी लोकेशनपर्यंत जाऊन याची खातरजमा केली. त्याठिकाणी कोणत्याही प्रकारचे विमान अथवा अवशेष आढळून आले नाहीत. त्यामुळे प्रशासनासह सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.  (Kolhapur News)
ऐन दिवाळीत वनविभाग तसेच प्रशासनाला मात्र या अफवेचा चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. परंतु गुगल मॅपवर विमानाची फक्त प्रतिकृतीच दिसून आल्याने विमान दुर्घटनेच्या अफवेला पूर्ण विराम मिळाला. गगनबावडा तालुका डोंगराळ असल्याने झाडी झुडपांने विस्तारलेला आहे. त्यामुळे  या ठिकाणी जाण्यास वन कर्मचारी यांना काट्याकुट्यातून वाट शोधत जावे लागले. त्यामुळे मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. तर मागील काही महिन्यापासून गुगल मॅपवर विमानाची प्रतिकृती दिसत असल्याचे काही नागरिकांकडून सांगितले जात आहे. परंतु, सोशल मीडियावर विमान कोसळल्याची चर्चा मात्र तालुक्यात दिवसभर सुरु होती.  (Kolhapur News)
विमान कोसळल्याची फक्त अफवाच
दिवसभर सोशल मीडियाच्या माध्यमातून विमान कोसळल्याची अफवा सर्वत्र पसरली होती. मात्र, या घटनेच्या ठिकाणी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. त्यानंतर ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले. गतवर्षी देखील गुगल मॅपवर विमानाची प्रतिकृती दिसत असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
– प्रियांका भवर, वनपरिक्षेत्र अधिकारी, गगनबावडा

हेही वाचा

 

Back to top button