कोल्हापूर : काळम्मावाडी थेट पाईपलाईनमुळे वर्षाला 15 कोटींची बचत | पुढारी

कोल्हापूर : काळम्मावाडी थेट पाईपलाईनमुळे वर्षाला 15 कोटींची बचत

सतीश सरीकर

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील पाणीपट्टीपोटी महापालिकेकडे वर्षाला सुमारे 50 कोटी जमा होतात. त्यापैकी सुमारे 36 ते 40 कोटी रु. विविध उपसा केंद्रांतील वीज बिलावर खर्च होतात. काळम्मावाडी धरणातून शहराला थेट पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा सुरू झाल्यावर उपसा केंद्रे बंद करण्यात येणार आहेत. फक्त काळम्मावाडी उपसा केंद्राचेच बिल भरावे लागणार आहे. परिणामी महापालिकेची वर्षाला सुमारे 15 कोटींची बचत होणार आहे.

शहराला सद्य:स्थितीत शिंगणापूर उपसा केंद्र, बालिंगा व नागदेववाडी उपसा केंद्राद्वारे पाणी पुरवठा केला जातो. शिंगणापूर उपसा केंद्र 2000 सालात बांधले असून याठिकाणी 435 हॉर्सपॉवरचे 5 पंप आहेत. रोज 4 पंप सुरू असतात आणि एक स्टँडबाय आहे. बालिंगा उपसा केंद्र 1949 सालातील असून 300 हॉर्सपॉवरचा एक आणि 150 हॉर्सपॉवरचे दोन पंप आहेत. नागदेववाडी उपसा केंद्र 1989 मध्ये बांधले असून याठिकाणी 200 हॉर्सपॉवर आणि 120 हॉर्सपॉवरचे प्रत्येकी एक पंप आहेत. नवीन आपटेनगर केंद्र 2000 सालात बांधले असून 170 हॉसपॉवरचे 5 पंप आहेत. त्यापैकी 4 कार्यरत आणि 1 स्टँडबाय आहे.

थेट पाईपलाईन योजनेसाठी काळम्मावाडी धरण क्षेत्रातील जॅकवेलवर पंप हाऊस बांधण्यात आले आहे. जॅकवेलमधील पाण्याचा उपसा करण्यासाठी 940 हॉर्सपॉवरचे चार पंप आहेत. त्यापैकी दररोज तीन पंप कार्यान्वित राहणार असून एक पंप स्टँडबाय असेल. हे पंप अत्याधुनिक आहेत. फाईव्ह स्टार रेटिंगचे पंप असून त्यामध्ये व्हीएफडी (व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह) पॅनेल बसविण्यात आले आहेत. त्यामुळे धरणातील पाणी पातळी कमी होईल त्यानुसार मोटरचे स्पीड कमी-जास्त होणार आहे. परिणामी त्यातून मोठ्या प्रमाणात विजेचे बचत होणार आहे. महिन्याला या ठिकाणचे बिल सुमारे दोन कोटी रु. अपेक्षित आहे. महापालिकेला केवळ हेच बिल भरावे लागणार आहे.

उपसा केंद्रे होणार बंद

सध्या असलेल्या उपसा केंद्रासाठी महापालिकेला महिन्याला सुमारे तीन ते साडेतीन कोटी रुपये बिल येते. यात बालिंगा उपसा केंद्राचे सुमारे सव्वादोन कोटी, नागदेववाडी व बालिंगा उपसा केंद्राचे सुमारे 70 ते 75 लाख, नवीन आपटेगनर केंद्राचे सुमारे 25 ते 30 लाख असा समावेश आहे. वर्षाला सुमारे 40 कोटीपर्यंत बिलाची रक्कम होते. काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईन योजना कार्यान्वित झाली आहे. त्यामुळे ही उपसा केंद्रे बंद करण्यात येणार आहेत. परिणामी त्यापोटी भरावे लागणार्‍या वीज बिलाची बचत होणार आहे.

* 940 हॉर्सपॉवरचे चार पंप
* दररोज 3 पंप कार्यान्वित
* स्टँडबायसाठी एक पंप
* फाईव्ह स्टार रेटिंग मोटर्स
* मोटरला व्हीएफडी पॅनेल
* मोठ्या प्रमाणात वीज बचत

Back to top button