सांगली : आटपाडी ग्रामपंचायत निवडणुकीत नवे समीकरण, तानाजीराव पाटील-अमरसिंह देशमुख एकत्र | पुढारी

सांगली : आटपाडी ग्रामपंचायत निवडणुकीत नवे समीकरण, तानाजीराव पाटील-अमरसिंह देशमुख एकत्र

आटपाडी, प्रशांत भंडारे : आटपाडी तालुक्यातील १७ गावांच्या निवडणुकांत यावेळी नवीन राजकीय समीकरणे उदयास आलेली दिसली. जिल्हा मध्यवर्ती बँक,बाजार समिती आणि साखर कारखाना निवडणुकीत तालुक्यात शिवसेनेच्या शिंदे गटाने बाजी मारली होती.
या पार्श्वभूमीवर झालेल्या निवडणुकीत आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्वबळावर आणि माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांच्या साथीने ८ ग्रामपंचायतीवर बाजी मारत भाजपला दिलासा दिला. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपमधील देशमुख बंधूंचे दोन गट झाल्याचे स्पष्टपणे दिसून आले. शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे समर्थक तानाजीराव पाटील यांच्यात आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्यात जवळीक निर्माण झाली आहे.

करगणी, बनपुरी आणि मासाळवाडी या तीन ठिकाणी पाटील आणि देशमुख यांची नवी आघाडी तयार झाली. बनपुरी आणि मासाळवाडीत या नव्या आघाडीने बाजी मारली. पण पडळकर यांनी करगणीत या आघाडीला जोरदार झटका दिला. गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसाला राजेंद्रअण्णा यांनी ‘एकच छंद गोपीचंद’ असा नारा देत पडळकर यांची उमेदवारी जाहीर केली. भाजप पदाधिकारी निवडीत डावलल्याने देशमुख गटाने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर भाजप विधानसभा निवडणूक प्रचार प्रमुख म्हणून अमरसिंह देशमुख यांची निवड करून त्यांना संधी देण्यात आली. त्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत आमदार गोपीचंद पडळकर यांची त्याच पदावर पुन्हा वर्णी लागली. त्यामुळे भाजपमध्ये सर्वकाही ठीक नाही हे दिसून आले.

माणगंगा साखर कारखाना निवडणुकीत आमदार बाबर यांचे तानाजीराव पाटील यांनी ऐकले नाही, असा आरोप अमरसिंह देशमुख यांनी केला होता. परंतु, अवघ्या चार महिन्यांत ग्रामपंचायत निवडणुकीत तानाजीराव पाटील आणि अमरसिंह देशमुख एकत्र आल्याचे चित्र धक्कादायक ठरले आहे. देशमुख बंधूंच्या दोन भूमिका कोणत्या राजकीय समीकरणांची नांदी ठरणार याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. हा बदल दबावापोटी आहे का? गरजेसाठी आहे का? का ती राजकीय अपरिहार्यता आहे? हे येणारा काळ सांगेल पण या ध्रुवीकरणामुळे संभ्रम वाढला आहे.

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, देशमुख बंधू आणि शिंदे गटाचे आमदार बाबर समर्थक तानाजीराव पाटील यांच्या भोवती तालुक्याचे राजकारण फिरते आहे. दरम्यान एकेकाळी तालुक्यात वर्चस्व असणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष मात्र आपल्या अस्तित्वासाठी झगडताना दिसत आहेत. आटपाडी तालुक्यातील तीन ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या. तर १४ गावाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने ८ ग्रामपंचायत ताब्यात वर्चस्व सिध्द केले. शिंदे गटाने ५ ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवला. ज्या कारभाऱ्यांच्या हातात सत्ता दिली त्यांच्या विरोधात जनतेने कौल दिल्याने १४ पैकी ८ ठिकाणी सत्तांतर झाले.या सर्व घडामोडीत काँग्रेस,राष्ट्रवादी रासप किंवा अन्य पक्षांचे अस्तित्व देखील जाणवले नाही.

हेही वाचंलत का?

Back to top button