महाडच्या औषधनिर्मिती कारखान्यात वायू गळतीमुळे आग; ७ कामगार मृत्युमुखी | पुढारी

महाडच्या औषधनिर्मिती कारखान्यात वायू गळतीमुळे आग; ७ कामगार मृत्युमुखी

महाड : पुढारी वृत्तसेवा : येथील औद्योगिक वसाहतीत औषधनिर्मिती कारखान्यात वायू गळतीनंतर स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत सात कामगारांचा कोळसा झाला. या सर्वांचे मृतदेह सापडले आहेत. त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. ब्ल्यूजेट केमिकल या कारखान्यात ही दुर्घटना शुक्रवारी सकाळी घडली.

सुरुवातीला सकाळी दहाच्या सुमारास वायू गळती सुरू झाली. पाठोपाठ भीषण स्फोट झाला आणि आग लागली. त्यात पाच कामगार जखमी झाले होते. तब्बल 11 कामगार बेपत्ता असल्याची माहिती महाडचे प्रांताधिकारी ज्ञानोबा बाणापुरे यांनी दुपारी दिली होती. संध्याकाळी आग आटोक्यात आल्यानंतर बेपत्ता कामगारांसाठी शोधमोहीम राबवण्यात आली. संध्याकाळपर्यंत जळालेल्या अवस्थेत सात मृतदेह सापडले तसेच 4 जण बेपत्ता असल्याचे सांगितले. त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी रात्री दिली आहे.

या दुर्घटनेत जखमी झालेल्या मयूर निंबाळकर (रा. जळगाव), राहुल गिरमे (धुळे), स्वप्निल मोरे (खेड), भीमाची मुर्मू (ओडिशा), विक्रम ढेरे (भोर), उत्तम विश्वास (बिहार) आणि ज्योतू तोबा पूूरम (बिहार) या सात कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सकाळी पहिल्या शिफ्टमध्ये सुमारे 54 कामगार कामावर आल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली.

दरम्यान, बेपत्ता असलेल्या 11 कामगारांमध्ये जिलवनकुमार चौबे, अभिमन्यू उराव, विकास महातो, शेषराव भुसारे, अक्षय सुतार, सोमनाथ विधाते, विशाल कोळी, संजय पवार, अस्लम शेख, सतीश साळुंके आणि आदित्य मोरे यांचा समावेश असल्याची माहिती रायगडचे निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी दिली.

दरम्यान, घटनेची माहिती समजताच जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, महाडचे प्रांताधिकारी ज्ञानोबा बानापुरे, तहसीलदार महेश शितोळे आदींनी घटनास्थळी धाव घेत बचाव आणि मदतकार्य सुरू करण्यासाठी यंत्रणा कार्यरत केल्या. महाड एमआयडीसीसह शेजारील लक्ष्मी ऑरगॅनिक, विरल कंपनी, महाड पालिका आणि माणगाव नगरपंचायतीच्या अग्निशमन दलांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले.

या अपघातानंतर महाड औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांत काम करणार्‍या कामगारांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे गेल्या महिनाभरातील या दुसर्‍या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Back to top button