Kolhapur News : ‘शाहुवाडी’त ९ सरपंचपदांसाठी २४ उमेदवार रिंगणात | पुढारी

Kolhapur News : 'शाहुवाडी'त ९ सरपंचपदांसाठी २४ उमेदवार रिंगणात

सुभाष पाटील

विशाळगड : शाहूवाडी तालुक्यात १० ग्रामपंचायत व एका गावच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी (दि ५) रोजी मतदान होत आहे. १० सरपंचाच्या जागांपैकी एक सरपंचपद बिनविरोध झाल्याने ९ सरपंच जागांसाठी २४ उमेदवार तर ६७ सदस्यांसाठी १६३ उमेदवार आणि एका पोटनिवडणूकीच्या एका जागेसाठी २ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे राहून आपले नशीब आजमावत आहेत. १२ ग्रामपंचायतीपैकी २ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. ३१ केंद्रावर रविवारी मतदान होत आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचार तोफा शुक्रवारी सायंकाळी (दि.३) थंडावल्या. शुक्रवारी पाच वाजल्यानंतर जाहीर प्रचार करता येणार नाही. या निवडणुकीत अनेक उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले आहे. (Kolhapur News)

तालुक्यातील १० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी उमेदवारांना चिन्ह वाटप होताच सुरू झाली होती. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या निवडणुकांचा धुरळा शुक्रवारी सायंकाळी शमला आहे. सरपंचपदांच्या ९ जागेसाठी २४ उमेदवार तर ६८ सदस्यपदांच्या जागेसाठी आपले भाग्य अजमाविण्यासाठी १६५ उमेदवार निवडणुकीच्या रणांगणात तळ ठोकून आहेत. यातील बिनविरोध झालेल्या जागा वगळता इतर उमेदवारांचे भाग्य ५ तारखेला होणाऱ्या मतदानाच्या रूपातून मतदान यंत्रामध्ये सील होणार आहे. मतदान सुरळीत पार पडावे, यासाठी निवडणूक अधिकारी रामलिंग चव्हाण व निवासी नायब तहसीलदार गणेश लव्हे, रवींद्र मोरे यांनी निवडणूक यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामकाजाविषयीचे मार्गदर्शन केले आहे. तसेच त्यांना दोनदा प्रशिक्षण दिले आहे. (Kolhapur News)

सरपंचपदासाठीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांमध्ये काट्याची लढत होण्याची चिन्ह आहे. मतदारांना आकृष्ट करण्यासाठी उमेदवार जंगी मेजवानी देत आहेत. सर्वच ग्रामपंचायत निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. यानिमित्ताने जुने नवे गट आमनेसामने आले आहेत. गटा-तटाच्या राजकारणाने निवडणुकीत रंगत आली आहे. अनेकांसाठी ही निवडणूक आरपारची ठरत आहे. जुने अनुभवी उमेदवार विरुद्ध नवख्या उमेदवारांनी बहुतेक ग्रामपंचायतीमध्ये आपली उमेदवारी दाखल करून निवडणुकीचा माहोल रंजक केला आहे. सोबत प्रचारासाठी फेसबुक, इन्सटा, व्हॉट्स ॲप सारखी डिजिटल माध्यमे वापरली जात आहेत.

Kolhapur News  : ६४ मतदान यंत्रे सील :

१० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी सीयू ३१ व बीयु ३३ असे एकूण ६४ मतदान यंत्रे सील करण्यात आली आहे. यावेळी तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी रामलिंग चव्हाण, निवासी नायब तहसीलदार गणेश लव्हे, रवींद्र मोरे यांच्यासह निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, सरपंच व सदस्य पदांचे उमेदवार त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

शनिवारी (दि.४) होणार मतदानाचे साहित्य वाटप :

निवडणुकीसाठी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी क्र १,२ व ३ व शिपाई यांना शनिवारी चार तारखेला सकाळी ८ ते १० यावेळेत मतदान साहित्य वाटप केले जाणार आहे. निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथके नियुक्त करण्यात आले असून एका पथकात पोलिस बलासह ५ जणांचा समावेश आहे.

निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायती :

सावर्डे खुर्द, सावे, सुपात्रे, मालेवाडी, आकुर्ळे, शेंबवणे, वालूर-जावळी, माण-पातवडे, कासार्डे, गेळवडे.

एका जागेसाठी पोटनिवडणूक : शिरगाव

हेही वाचा 

कोल्हापूर : मनपाच्या घरफाळा विभागाचे दोन लिपिक लाच घेताना जेरबंद

कोल्हापूर जिल्ह्यात तीन वर्षांत दिले 7 हजार 800 कुणबी जातीचे दाखले

कोल्हापूर : कारखानदारांना दोन दिवसांचा अल्टिमेटम : राजू शेट्टी

Back to top button