कट्टर विरोधक सतेज पाटील, धनंजय महाडिक एका व्यासपीठावर | पुढारी

कट्टर विरोधक सतेज पाटील, धनंजय महाडिक एका व्यासपीठावर

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक खा. धनंजय महाडिक व आ. सतेज पाटील शनिवारी शासकीय कार्यक्रमाच्या निमित्ताने बर्‍याच वर्षांनी एका व्यासपीठावर आल्याने जिल्ह्याच्या राजकारणात तो चर्चेचा विषय ठरला. दोघांनी एकत्र फेटेही बांधले; मात्र तासभर चाललेल्या कार्यक्रमात दोघांनीही एकमेकांकडे पाहिलेदेखील नाही.

जिल्ह्याच्या राजकारणात महाडिक व पाटील यांच्यातील वाद आता नवा राहिला नाही. जवळपास गेल्या दीड दशकापासून त्यांच्यामध्ये राजकीय वर्चस्वासाठी वाद सुरू आहे. दोघेही एकमेकांना पाण्यात बघत असतात. त्यांच्यामध्ये आरोप, प्रत्यारोपाच्या फैरी सतत सुरू असतात. कधी ‘गोकुळ’वरून तर कधी राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या राजकारणावरून. नुकत्याच झालेल्या राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीत तर टोकाचे आरोप एकमेकांवर करण्यात आले होते. त्यांच्यातील टोकाच्या संघर्षामुळे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना देखील पाटील किंवा महाडिक गटाचे कार्यकर्ते असे ओळखले जातात.

दोन्ही नेत्यांमधील ईर्ष्या निवडणुकीत कार्यकर्त्यांमध्ये देखील पहावयास मिळते. त्यामुळे महाडिक व पाटील गेल्या काही वर्षांत कधीही एका व्यासपीठावर दिसले नाहीत. कसबा बावडा येथील शासकीय कार्यक्रमाच्या निमित्ताने मात्र ते एका व्यासपीठावर दिसले आणि राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली. व्यासपीठावर जाण्यापूर्वी दोघांनी एकत्र फेटे बांधून घेतले. दोघांमध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ बसले होते. मुश्रीफ कधी पाटील यांच्याशी, तर कधी महाडिक यांच्याशी बोलत होते. कार्यक्रमासाठी सर्वजण व्यासपीठावर गेले. तासभर हा कार्यक्रम चालला; परंतु महाडिक व पाटील यांनी एकमेकांकडे पाहिले देखील नाही.

Back to top button