David Warner Pushpa Style : मैं झुकेगा नहीं..! पाक विरुद्ध शतक झळकावताच वॉर्नरचे ‘पुष्पा’ स्टाईलने सेलिब्रेशन (Video)) | पुढारी

David Warner Pushpa Style : मैं झुकेगा नहीं..! पाक विरुद्ध शतक झळकावताच वॉर्नरचे ‘पुष्पा’ स्टाईलने सेलिब्रेशन (Video))

पुढारी ऑनलाईन डेस्क : David Warner Pushpa Style : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या 18 व्या सामन्यात डेव्हिड वॉर्नरने शानदार फलंदाजी केली आणि पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावले. वॉर्नरने 85 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. आपल्या शतकी खेळीत त्याने 7 चौकार आणि 6 षटकार मारले. वॉर्नरचे वनडे क्रिकेटमधील हे 21 वे शतक आहे. पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात वॉर्नरने मिचेल मार्शच्या साथीने पहिल्याच षटकापासून आक्रमक खेळी करण्यास सुरुवात केली. कांगारूंच्या या दोन फलंदाजांच्या वादळात पाकिस्तानी गोलंदाज अक्षरश: उडून गेले.

वॉर्नरनेचे यंदाच्या विश्वचषकातील हे पहिलेच शतक ठरले आहे. तर वनडे विश्वचषकातील हे त्याचे पाचवे शतक आहे. शतक झळकावल्यानंतर वॉर्नरला अत्यानंद झाला. त्याने पहिला आपल्या खास शैलीत हवेत उंच उडी मारली आणि प्रेक्षकांना बॅट दाखवून अभिवादन केले. त्यानंतर काही क्षणातच त्याने अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटातील मैं झुकेगा नहीं..! या आयकॉनिक स्टाईलमध्ये गळ्याखालून हात फिरवला आणि ‘वॉर्नर झुकेगा नही..’ असाच मॅसेज पाक गोलंदाजांना दिला. सेलिब्रेशनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नेटकरी वॉर्नरल ज्युनियर पुष्पा म्हणून संबोधत आहे. (David Warner Pushpa Style)

पुष्पा हा तेलगू अभिनेता अल्लू अर्जुनचा सुपरहिट चित्रपट आहे. ज्याचा वॉर्नर खूप मोठा चाहता आहे. वॉर्नर अनेकदा त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पुष्पा चित्रपटातील गाण्यांचे किंवा संवादांचे व्हिडिओ पोस्ट करतो. अलीकडेच, जेव्हा अल्लू अर्जुनला पुष्पा या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, तेव्हा वॉर्नरने देखील त्याला शुभेच्छा दिल्या होत्या.

वॉर्नरचे पाकिस्तानविरुद्ध चौथे शतक (David Warner Pushpa Style)

या सामन्यात वॉर्नरने प्रथम 39 चेंडूत चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानंतर 85 चेंडूत शतक पूर्ण केले. त्याचे हे एकदिवसीय क्रिकेटमधील 21 वे शतक आहे, तर पाकिस्तानविरुद्धचे एकदिवसीय फॉर्मेटमधील हे चौथे शतक आहे. आपल्या 100 धावांच्या खेळीत त्याने 6 षटकार आणि 7 चौकार लगावले. वॉर्नरच्या शतकानंतर पुढच्याच चेंडूवर मिचेल मार्शनेही आपले शतक पूर्ण केले. त्याने 100 चेंडूत शतक पूर्ण केले.

वॉर्नरची पाकिस्तानविरुद्धची वनडे शतके

130 धावा (119 चेंडू), सिडनी, 2017
179 धावा (128 चेंडू), अॅडलेड, 2017
107 धावा (111 चेंडू), टॉंटन, सीडब्ल्यूसी 2019
100* धावा (85 चेंडू), बंगळूर, 2023 (वृत्त लिहिपर्यंत)

रिकी पाँटिंग आणि संगकाराची बरोबरी

वॉर्नरचे हे विश्वचषकातील पाचवे शतक आहे. यासह त्याने रिकी पाँटिंग आणि कुमार संगकाराची बरोबरी केली. एकदिवसीय विश्वचषकात पाँटिंग आणि संगकाराने प्रत्येकी 5 शतके झळकावली आहेत. या यादीत रोहित शर्मा 7 शतकांसह पहिल्या तर सचिन तेंडुलकर 6 शतकांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

विश्वचषकात सर्वाधिक शतके

7 – रोहित शर्मा
6 – सचिन तेंडुलकर
5 – रिकी पाँटिंग
5- कुमार संगकारा
5 – डेव्हिड वॉर्नर

वॉर्नरने एबी डिव्हिलियर्सचा विक्रम मोडला

वॉर्नर एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 21 शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे. त्याने द. आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्सला मागे टाकले आहे. वॉर्नरने 152 डावांमध्ये तर एबीने 183 डावांमध्ये 21 शतके पूर्ण केली आहेत. या यादीत पहिल्या क्रमांकावर हशिल आमला आहे ज्याने 116 डावांमध्ये 21 एकदिवसीय शतके झळकावली होती.

सर्वात वेगवान 21 एकदिवसीय शतके फटकावणारे फलंदाज (डावाच्या बाबतीत)

116 : हाशिम आमला
138 : विराट कोहली
152 : डेव्हिड वॉर्नर
183 : एबी डिव्हिलियर्स
186 : रोहित शर्मा
200 : सचिन तेंडुलकर

एकदिवसीय विश्वचषकात सलामीच्या फलंदाजांची शतके

उपुल थरंगा आणि तिलकरत्ने दिलशान (श्रीलंका) विरुद्ध झिम्बाब्वे, पल्लेकेले, 2011
उपुल थरंगा आणि तिलकरत्ने दिलशान (श्रीलंका) विरुद्ध इंग्लंड, कोलंबो (आरपीएस), 2011, उपांत्यपूर्व फेरी
रोहित शर्मा आणि केएल राहुल (भारत) विरुद्ध श्रीलंका, लीड्स, 2019
डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध पाकिस्तान, बेंगळुरू, 2023

सक्रिय खेळाडूंची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके

विराट कोहली : 78
डेव्हिड वॉर्नर : 47
जो मार्ग : 46
रोहित शर्मा : 45
स्टीव्ह स्मिथ : 44
केन विल्यमसन : 41

Back to top button