बंगल्याच्या आवारात बिबट्यांचा चार तास ठिय्या | पुढारी

बंगल्याच्या आवारात बिबट्यांचा चार तास ठिय्या

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा :  वारुळवाडी-गुंजाळवाडी येथील बाळासाहेब वायकर यांच्या बंगल्याच्या आवारात बिबट्यांनी सोमवारी (दि. 16) रात्री 12 ते मंगळवारी (दि. 17) पहाटे 4 वाजेपर्यंत मनमुराद बागडण्याचा आनंद घेतला. या वेळी त्यांनी वायकर यांचा ‘टायगर’ लॅब जातीचा कुत्राही फस्त केला. दोन मोठे बिबटे आणि दोन बछड्यांचा हा थरार ‘सीसीटीव्ही’त कैद झाला आहे. सात फूट उंचीच्या सुरक्षा सुरक्षा भिंतीवरून मोठ्या बिबट्याने आवारात प्रवेश केल्याचे, तर एक बिबट्या जिन्यावरून पायर्‍या चढून वर आल्याचेही सीसीटीव्हीत कैद झाले आहे, तर दोन लहान बछडे गेटमधून आत आले. घटनेच्या वेळी बाळासाहेब वायकर यांच्या घरात दोन लहान मुले, पत्नी, आई आणि कामाला असलेला मुलगा असे सहा जण होते.

याबाबत मीराबाई दशरथ वायकर यांनी सांगितले की, मी पाच वाजता उठले. नेहमीप्रमाणे ’टायगर’ या कुत्र्याचा आवाज का आला नाही म्हणून मुलाला उठवले. त्यांनी पाहणी केली असता, बिबट्याने कुत्र्याला फस्त केल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने घरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता घराच्या आवारात रात्री बिबटे आल्याचे निदर्शनात आले. याबाबत वन विभागाला कळवले. वन कर्मचार्‍यांनी काळजी घ्या, दरवाजे बंद करून झोपा अशा जुजबी सूचना देऊन ते निघून गेले.

वन विभागाने हे सगळे बिबटे पकडून न्यावेत व त्यांची नसबंदी करावी. शासनाला माणसापेक्षा बिबटे प्रिय असतील तर त्यांनी ते पाळावेत.

                                                                          मीराबाई वायकर

हत्तीवर्गीय प्राण्यांचा ज्या ठिकाणी उपद्रव आहे, त्या ठिकाणी वापरले जाणारे ”अनायडर” नावाचे उपकरण प्रथमच या ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर लावत आहोत. या उपकरणाच्या आसपास बिबट्या आल्यास अलार्म वाजतो आणि प्राणी तेथून पळून जातो, अशी त्याची प्रणाली आहे.
                                                              अमित भिसे, सहायक वनसंरक्षक

 

Back to top button