chiplun flyover : चिपळुणात क्रेनसह उड्डाणपूल कोसळला | पुढारी

chiplun flyover : चिपळुणात क्रेनसह उड्डाणपूल कोसळला

चिपळूण : पुढारी वृत्तसेवा : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील मध्यवर्ती असणार्‍या चिपळुणातील (chiplun flyover) बहादूर शेख चौकामधील उड्डाण पुलाचे काम सुरू असतानाच, सोमवारी (दि. 16) सकाळी या उड्डाण पुलाला तडा गेला. यानंतर दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास तयार झालेल्या पुलाचा भाग क्रेनसह कोसळला. या अपघातात तीन ते चार जणांना किरकोळ दुखापत झाली. आ. शेखर निकम याचवेळी तडा गेलेल्या पुलाची पाहणी करण्यासाठी आले असताना हा पूल कोसळला. यावेळी झालेल्या धावपळीमध्ये त्यांच्याबरोबर असलेल्या दोन कार्यकर्त्यांना किरकोळ दुखापत झाली. या घटनेनंतर मुंबई-गोवा महामार्गाची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. सायंकाळी एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम तब्बल सतरा वर्षे सुरू आहे. केंद्र सरकारने हा महामार्ग डिसेंबर 2023 मध्ये पूर्ण करणार, असा दावा केला आहे. मात्र, प्रत्यक्षात हे काम मुदतीत पूर्ण होईल की नाही याबाबत शंका आहे. शहरातील मध्यवर्ती बहादूर शेख चौक येथे उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील सर्वात मोठा पूल ठरणार आहे. सहा महिन्यांपूर्वी गर्डर बसविण्याच्या कामाला सुरुवात झाली. मात्र, हे काम अत्यंत संथगतीने सुरू असून मध्यंतरी गणेशोत्सवाच्या आधीच गर्डर सरकला होता. यामुळे या ठिकाणी परिस्थिती धोकादायक होती. मात्र, हा गर्डर क्रेनने बसविण्यात आला.

आता गर्डर बसविण्याच्या कामाला वेग मिळाला असतानाच आज सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास अचानक पुलाच्या खालच्या भागाला मोठा तडा जाऊन आवाज झाला आणि काही भागाचे सिमेंट कोसळले. यानंतर या ठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. अनेकजण या ठिकाणी पाहणी करीत होते. दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास चिपळूण-संगमेश्वरचे आ. शेखर निकम घटनास्थळी पहणी करण्यासाठी आले असता ते अधिकार्‍यांकडून पुलाची माहिती घेत होते. याचवेळी मोठा आवाज होऊन हा पूल कोसळला. सुमारे तीनशे मीटरपर्यंत लावलेले गर्डर जमिनीवर धाडदिशी कोसळले. त्यांच्या हादर्‍याने आसपासच्या इमारतींमध्ये देखील धक्का जाणवला. ही दुर्घटना घडत असतानाच आ. शेखर निकम व त्यांचे कार्यकर्ते सैरावैरा पळू लागले. जीव वाचविण्यासाठी पळताना आ. शेखर निकम यांनादेखील चार ते पाच ठिकाणी खरचटले असून त्यांचे दोन कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. (chiplun flyover)

या घटनेनंतर बहादूरशेख चौकात बघ्यांचीएकच गर्दी झाली. आ. शेखर निकम, माजी आ. सदानंद चव्हाण, खा. विनायक राऊत, आ. भास्कर जाधव, यांच्यासह बाळा कदम, सचिन कदम, शशिकांत मोदी, राजू देवळेकर, जयंद्रथ खताते आदींनी घटनास्थळी धाव घेतली व परिस्थितीची पाहणी केली. उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, प्रांताधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे यांनीदेखील या पुलाची आणि परिस्थितीची पाहणी केली. बहादूरशेख चौकातील वाहतूक एकेरी वळविण्यात आली तर अवजड वाहने गुहागर बायपास, कळंबस्ते फाटा या ठिकाणी थांबविण्यात आली असून थोड्या-थोड्या वेळाने वाहने सोडण्यात येत आहेत. बहादूरशेख चौकात चारही बाजूने पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

‘समृद्धी’ची पाहणी होते मग कोकणच्या महामार्गाची का नाही? : आ. भास्कर जाधव

मुंबई-गोवा महामार्ग दोन राज्ये जोडणारा महामार्ग आहे. मात्र, कोकणचे दुर्दैव या महामार्गाच्या आडवे येते की काय असा सवाल आ. भास्कर जाधव यांनी केला. केंद्र व राज्य सरकारला कोकणात पर्यटन उद्योग वाढावा असे वाटते त्यासाठी रस्ते चांगले करावे असे वाटते. मात्र, अठरा वर्षे हा महामार्ग रखडतो हा प्रश्न आहे. ही घटना गंभीर असली तरी सुदैवाने कोणी जखमी झाले नाही. तरी याची जबाबदारी शासनाने घ्यावी. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबद्दल आदर आहे. मात्र, त्यांनी शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी या रस्त्याला विरोध केला, असे भाष्य केले होते. मात्र, त्यांची नावे त्यांनी जाहीर केली नाहीत. यानंतर त्यांना आपण पनवेलपासून या रस्त्याची स्वत: पाहणी करा. म्हणजे वस्तूस्थिती कळेल. तुम्ही बाय रोड या असे आवाहन केले होते. मात्र, ते एकदा आले ते हवाई आले. जमिनीवरून या रस्त्याची पाहणी करावी. समृद्धी महामार्गाची पाहणी होते मग कोकणचा महामार्ग का पाहू शकत नाही? घटना होऊन पाच ते सहा तास अधिकारी आले नाहीत. त्यांना धडा शिकवू, असे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आ. भास्कर जाधव यांनी सांगितले.

कंपनीच्या अधिकार्‍याला हार-तुरे

बहादूरशेख चौक येथील ओव्हरब्रिजला सकाळी तडा गेल्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते घटनास्थळी धावले. संबंधित ठेकेदार कंपनीच्या अधिकार्‍याला या ठिकाणी बोलाविण्यात आले व उत्कृष्ठ आणि दर्जेदार कामाबद्दल हार घालण्यात आला आणि अशा पद्धतीने शिवसेना पदाधिकार्‍यांनी या ठिकाणी गांधीगिरी केली. मुंबई-गोवा महामार्गाचे काम अशाच चांगल्या पद्धतीने करा. आतापर्यंतचे काम उत्कृष्ठ दर्जाचे झाले आहे. म्हणूनच या ब्रिजला तडे गेले आहेत असे बोलून त्याला हार घातला. यावेळी शिवसेना उबाठा गटाचे तालुकाप्रमुख विनोद झगडे, विभागप्रमुख यतीन कानडे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. सकाळी केलेली गांधीगिरी ताजी असतानाच दुपारी मात्र हा ब्रिज पूर्णच कोसळला.

320 कोटींच्या पुलाचे काम तीन वर्षे सुरूच.. (chiplun flyover)

मुंबई-गोवा महामार्गावरील सर्वात लांब असलेला बहादूरशेख चौक येथील उड्डाण पूल तब्बल 320 कोटी रूपयांचा आहे. 1.75 कि.मी. लांबीचा हा पूल असून बहादूरशेख चौक ते प्रांत कार्यालयापर्यंत जाणार आहे. या उड्डाण पुलासाठी 46 पिलरचे काम करण्यात आले आहे. ईगल इन्फ्रा कंपनीमार्फत या पुलाचे काम सुरू असून तब्बल तीन वर्षे हे काम सुरूच आहे. सहा महिन्यांपूर्वी गर्डर चढविण्याच्या कामाला सुरुवात झाली. त्यानंतरची ही दुसरी घटना आहे. गणेशोत्सवामध्ये एक गर्डर सरकला होता, तो बसविण्यात आला. मात्र, आता टेस्टींगचे काम सुरू असताना शॉर्ट सर्किट होऊन आतील वायरने पेट घेतला आणि घर्षणाने हा पूल कोसळला असे कंपनीच्या अभियंत्यांचे प्राथमिक सांगणे आहे. मात्र, या पुलाच्या कामाबाबत शंका उपस्थित होत असून थर्ड पार्टी ऑडिट करावे अशी मागणी होत आहे

Back to top button