Satara News : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी आजपासून ‘गट’स्थापना | पुढारी

Satara News : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी आजपासून ‘गट’स्थापना

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यातील 133 ग्रामपंचायतींसाठी आजपासून धुरळा उडणार असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये गटातटांच्या राजकारणाला जोर येणार असून, गावगुंडीला प्रोत्साहन मिळणार आहे. निवडणुकीच्या आखाड्यात कोण कोण उतरणार? याकडे लक्ष लागले असून भाऊबंदकीलाही जोर येणार आहे. दरम्यान, काही गावांनी एकोपा जोपासत बिनविरोधचा मार्ग करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

सातारा जिल्ह्यातील डिसेंबर 2023 या कालावधीत मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. सोमवार दि. 16 ऑक्टोबरपासून जिल्ह्यातील 133 ग्रामपंचायतींसाठी अर्ज भरण्याची कार्यवाही सुरू होत आहे.

सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील 5, कराड तालुक्यातील 16, पाटण तालुक्यातील 26, कोरेगाव तालुक्यातील 13, वाई तालुक्यातील 16, महाबळेश्वर तालुक्यातील 17, फलटण तालुक्यातील 4, माण तालुक्यातील 4, खटाव तालुक्यातील 8, जावली तालुक्यातील 24 अशा मिळून 133 ग्रामपंचायतीमधील 412 प्रभागातील 1 हजार 13 सदस्यांसाठी निवडणूक होत आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील 133 ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या असल्याने ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापले आहे. अर्ज भरण्यासाठी पॅनेल व आघाड्यांच्या गावोगावी बैठका सुरू असून उमेदवार निश्चित करण्यासाठी कार्यकर्त्यांसह राजकीय पदाधिकार्‍यांची धावाधाव सुरू आहे. ऐन नवरात्र उत्सवाच्या कालावधीत ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला असल्याने नवरात्र
उत्सव मंडळांना सुगीचे दिवस आले आहेत.

मैदानात उतरण्यासाठी 20 रोजी अखेरची संधी

सोमवार दि. 16 ते 20 ऑक्टोबर या कालावधीत सकाळी 11 ते 3 यावेळेत उमेदवारी अर्ज सादर करणे, दि. 23 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून आलेल्या उमेदवारांच्या अर्जाची छाननी केली जाणार आहे. दि. 25 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्याच दिवशी निवडणूक लढवणार्‍या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द करून चिन्हाचे वाटप करण्यात येणार आहे. रविवार दि. 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.30 ते 5.30 यावेळेत मतदान होणार आहे. सोमवार दि. 6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक शाखेतून देण्यात आली.

Back to top button