सातारा: हजारमाचीचे उपसरपंच प्रशांत यादव यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल | पुढारी

सातारा: हजारमाचीचे उपसरपंच प्रशांत यादव यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल

कराड, पुढारी वृत्तसेवा: कराड तालुक्यातील हजारमाचीचे उपसरपंच प्रशांत यादव यांच्याविरोधात तहसिलदार विजय पवार यांच्याकडे अविश्वास दर्शक ठराव दाखल करण्यात आला आहे. सरपंचांसह 14 सदस्यांनी उपसरपंचांवर अविश्वास दर्शक ठराव आणला आहे. गुरूवारी (दि.12) तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतीची विषेश सभा आयोजित करण्यात आली आहे.

कराड उत्तर मतदारसंघातील राजकीयदृष्टया महत्वाची व मोठी ग्रामपंचायत म्हणून हजारमाचीची ओळख आहे. गेली अडीच वर्षांपासून सरपंचपदी विद्या घाबाडे व उपसरपंचपदी प्रशांत यादव काम पहात आहेत. उपसरपंच प्रशांत यादव हे ग्रामपंचायतीच्या मासिक मिटींगमध्ये सदस्यांना उद्धटपणे बोलणे व सदस्यांना अपमानास्पद वागणूक देत आहेत. तसेच ग्रामपंचायतीने मंजूर केलेल्या विकासकामांच्या ठरावाच्या अंमलबजावणीत अडथळा आणत आहेत. तर ग्रामसभेत ग्रामस्थांबरोबर उद्धटपणे बोलतात, ग्रामस्थांच्या सुचनांचा आदर करीत नाहीत. म्हणून उपसरपंच प्रशांत यादव यांच्या विरोधात अविश्वास दर्शक ठराव दाखल करीत असल्याचे ठरावात म्हटले आहे.

17 पैकी 14 सदस्यांनी समक्ष उपस्थित राहून तहसिलदार विजय पवार यांच्याकडे ठराव दाखल केला. यावेळी सरपंच विद्या घबाडे, सदस्य कल्याणराव डुबल, शरद कदम, अवधुत डुबल, संगीता डुबल, सोमनाथ सुर्यवंशी, जयश्री पवार, सीता माने, पितांबर गुरव, पूनम रामुगडे, विनोद डुबल, सारिका लिमकर, निर्मला जिरगे, ऐश्वर्या कांबळे आदी सदस्य उपस्थित होते.

अविश्वास दर्शक ठराव दाखल झाल्यानंतर तहसिलदार विजय पवार यांच्या वतीने सर्व सदस्यांना विषेश सभेची नोटीस बजावण्यात आली आहे. नोटीसीत म्हटल्याप्रमाणे सदस्य कल्याणराव डुबल व इतर 13 सदस्यांनी उपसरपंच प्रशांत यादव यांच्याविरूद्ध समक्ष अविश्वास दर्शक ठराव दिला आहे. या ठरावाच्या अनुशंगाने गुरूवारी (दि. 12) दुपारी 12 वाजता हजारमाची ग्रामपंचायत कार्यलयात सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांची विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. स्वता तहसिलदार विजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होणार असल्याचे नोटीशीत म्हटले आहे.

हेही वाचा 

Back to top button