सातारा जिल्ह्यातील धरणे 85 टक्क्यांवरच | पुढारी

सातारा जिल्ह्यातील धरणे 85 टक्क्यांवरच

सातारा, पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्ह्यातील कोयना, धोम, धोम-बलकवडी, कण्हेर, उरमोडी व तारळी धरणात आजअखेर सुमारे 85 टक्के पाणी आहे. मात्र गतवर्षी आजअखेर 99.31 टक्के पाणी होते. गतवर्षीपेक्षा धरणात 14.31 टक्के पाणीसाठा कमी असून, पूर्णक्षमतेने धरणे न भरल्यास शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात सर्वत्र उशिरा पावसाने सुरुवात केली. जिल्ह्याच्या पश्चिम भागात दरवर्षीच्या सरासरी पावसापेक्षा पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. तर पूर्व भागात पावसाची भुरभुर आहे. जिल्ह्याच्या धरण पाणलोट क्षेत्रातही म्हणावा असा पाऊस पडत नसल्याने धरणे अद्यापही कोरडीच आहेत. दरवर्षी जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात व ऑगस्ट पहिल्या आठवड्यात धरणे पूर्ण क्षमतेने भरत असतात मात्र यावर्षी ऑक्टोबर महिना उजाडला तरीही धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा नाही.

त्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. रविवारी सर्वत्र पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. धरण पाणलोट क्षेत्रातही चांगला पाऊस झाला. मात्र सोमवार सकाळपासून पुन्हा पावसाने उघडीप दिली आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागात पाण्यासाठी नागरिकांची वणवण सुरू आहे. 92 गावे व 432 वाड्यांमधील नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पावसाने अशीच उघडीप दिल्यास आणखी टँकरग्रस्त गावांची भर पडणार आहे.

कोयना धरणात गतवर्षी आजअखेर 99.70 टक्के पाणी होते. मात्र यावर्षी 88.54 टक्के पाणी असून पाणीसाठा 88.65 टीएमसी आहे. धोम धरणात गतवर्षी आजअखेर 95.55 टक्के पाणी होते. मात्र यावर्षी 73.31 टक्के पाणी असून पाणीसाठा 8.57 टीएमसी आहे. धोम बलकवडी धरणात गतवर्षी आजअखेर 100 टक्के पाणी होते. मात्र यावर्षी 95.71 टक्के पाणी असून पाणीसाठा 3.79 टीएमसी आहे. कण्हेर धरणात गतवर्षी आजअखेर 99.79 टक्के पाणी होते. मात्र यावर्षी 80.60 टक्के पाणी असून पाणीसाठा 7.73 टीएमसी आहे. उरमोडी धरणात गतवर्षी आजअखेर 99.90 टक्के पाणी होते. मात्र यावर्षी 56.27 टक्के पाणी असून पाणीसाठा 5.43 टीएमसी आहे. तारळी धरणात गतवर्षी आजअखेर 97.95 टक्के पाणी होते. मात्र यावर्षी 95.21 टक्के पाणी असून पाणीसाठा 5.56 टीएमसी आहे.

Back to top button