इचलकरंजी शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीला उदंड उत्साहात सुरवात | पुढारी

इचलकरंजी शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीला उदंड उत्साहात सुरवात

इचलकरंजी:पुढारी वृत्तसेवा इचलकरंजी शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीला उदंड उत्साहात सुरवात झाली आहे. परंपरेनुसार मानाच्या श्री बिरदेव गणेशोत्सव मंडळाच्या पालखीचे मान्यवरांच्या हस्ते पुजन करुन शिवतीर्थ येथून इचलकरंजीतील श्री विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ करण्यात आला. आमदार प्रकाश आवाडे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक दिलीप भुजबळ-पाटील, पोलिस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलिस अधिक्षक निकेश खाटमोडे-पाटील, महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, पोलीस उपअधिक्षक समीरसिंह साळवे, प्रांताधिकारी सौ. मोसमी चौगुले, मदन कारंडे, माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र माने, पुंडलिकभाऊ जाधव आदी मान्यवरांच्या हस्ते श्री गणेशाचे पूजन करण्यात आले.

यावेळी इचलकरंजी पोलिस दलाच्या श्रींचे पूजन करण्यात आले. यावेळी पोलिसांनीही गाण्यावर ठेका धरत नृत्याचा आनंद लुटला. तर महिला होमगार्डनी झिम्मा फुगडीचा फेर धरत मिरवणुकीत सहभाग घेतला. यावेळी पोलीस निरीक्षक राजू ताशीलदार, सत्यवान हाके, प्रविण खामकर, शहर वाहतूक शाखेचे सपोनि राजीव पाटील, अप्पर तहसिलदार मनोज ऐतवडे, प्रकाश दत्तवाडे, अनिल डाळ्या, रवि रजपुते, विठ्ठल चोपडे, जहाँगिर पटेकरी, सुरेशदादा पाटील, दिलीप मुथा, राजू आलासे, सयाजी चव्हाण, महादेव गौड, सदा मलाबादे आदी मान्यवर उपस्थित होते.

विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, सेवासंस्था व प्रसारमाध्यमांच्या वतीने विसर्जन मार्गावर उभारण्यात आलेल्या स्वागत कक्षांचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. बहुतांशी मंडळांनी आपल्या श्री मूर्ती शिवतीर्थ परिसरात आणून ठेवल्या आहेत. तर जल्लोषी मिरवणूकांचे नियोजन करण्यात आल्यामुळे दुपारपर्यंत विसर्जन मिरवणूकीत फारशी गर्दी दिसत नव्हती. दुपारनंतरच मंडळे बाहेर पडली.

निमंत्रण पत्रिकेवरून नाराजी

इचलकरंजीतील श्री विसर्जन मिरवणूकीच्या शुभारंभ कार्यक्रम पत्रिकेवरून नाराजी नाट्य दिसून आले. शहर वाहतूक शाखेच्या वतीने कार्यक्रम आयोजित केला जातो. आजी-माजी लोकप्रतिनिधींना बोलविण्याची परंपरा आहे. तशी कार्यक्रमपत्रिकाही प्रसिध्द केली जाते. परंतु यंदा त्यामध्ये खंड पडला. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार सुरेश हाळवणकर, माजी नगराध्यक्षा यांच्यासह माजी लोकप्रतिनिधी यांची नावे वगळण्यात आल्यामुळे त्यांच्या समर्थकांतून तीव्र नाराजीचा सूर उमटत होता. त्यातच या दोघांसह अनेक मान्यवर या कार्यक्रमात सहभागी न झाल्याने त्याची उलटसुलट चर्चा कार्यक्रम स्थळी रंगली होती.

Back to top button