महायुतीत खूप गर्दी, आता नवा पक्ष नको : रामदास आठवले | पुढारी

महायुतीत खूप गर्दी, आता नवा पक्ष नको : रामदास आठवले

नागपूर;  पुढारी वृत्तसेवा : आधीच महायुतीमध्ये गर्दी वाढल्याने आता नव्या पक्षांना प्रवेश नको, अशी भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपाईचे नेते रामदास आठवले यांनी आज (दि. २८) माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे. राज्यात भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, रिपाई सरकार सत्तेवर असताना आता अजित पवारही सरकारमध्ये आले आहेत, याकडे त्यांनी आवर्जून लक्ष वेधले.

विदर्भ दौऱ्यावर असलेले आठवले म्हणाले की, अजित पवारांच्या सहभागामुळे महायुती मजबूत झाली आहे. परंतु, लोकसभा व विधानसभेच्या जागा शेवटी कुणाला व किती मिळणार असा प्रश्न निर्माण होणार आहे. अर्थातच याबाबत आम्ही सगळे पक्ष एकत्र बसून निर्णय घेऊ. मात्र, आता जागेचा तिढा वाढू नये म्हणून आणखी नव्या पक्षांना महायुतीत प्रवेश देण्यात येऊ नये. आमच्या पक्षाकडून महाराष्ट्रात लोकसभेच्या दोन आणि विधानसभेच्या १० ते १२ जागांची मागणी करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशसह इतरही राज्यात आमच्या पक्षाची ताकद असल्याने तेथेही विधानसभा आणि लोकसभेच्या जागांची मागणी भाजपकडे केली जाईल, असेही आठवले यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, सरकारच्या विरोधात लढण्यासाठी विरोधक एकत्र आले असले तरी त्यांनी इंडिया हे नाव देणे योग्य नाही. विरोधकांना सध्या पंतप्रधान पदाचा उमेदवारही सांगता येत नाही यावर आठवले यांनी भर दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एनडीए सरकार देशात येणार असल्याचे सांगितले.

Back to top button