Mumbai-Goa Highway : गणेशोत्सवासाठी मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना एक महिना बंदी | पुढारी

Mumbai-Goa Highway : गणेशोत्सवासाठी मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना एक महिना बंदी

जयंत धुळप

रायगड: मुंबई- गोवा महामार्गाच्या पाहणी दौऱ्यास आलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण शनिवारी वाहतूक कोंडीत अडकले होते. तर अन्य वाहनांना तब्बल चार ते पाच तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले होते. पळस्पेकडून महाडकडे जाणाऱ्या लेनच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरु असल्याने दुसऱ्या लेनवर सातत्याने होणाऱ्या कोंडीत वाहने अडकत आहेत. त्याच बरोबर काँक्रीटीकरणाच्या कामात देखील सातत्याने व्यत्यय येत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गाच्या पळस्पे ते वाकण या टप्प्यात सर्व प्रकारच्या जड व अवजड वाहनांना रविवार २७ ऑगस्टपासून तब्बल एक महिना म्हणजे २८ सप्टेंबरपर्यंत प्रवेश बंदी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.  त्याची अंमलबजावणी रविवारपासून तत्काळ करण्यात आली आहे. (Mumbai-Goa Highway)

Mumbai-Goa Highway : गणेशोत्सवापूर्वी काम पूर्ण होणे आवश्यक

१९ सप्टेंबर रोजी कोकणवासीयांचे आराध्य दैवत असलेल्या गणरायांचे आगमन होणार आहे. गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड प्रमाणात असते. पळस्पे ते वाकण दरम्यानच्या महामार्गाच्या एका लेनचे काँक्रीटीकरण सध्या सुरु आहे. ते काम गणेशोत्सवापूर्वी पूर्ण होणे आवश्यक आहे, त्याच बरोबर गणेशोत्सवाकरिता मोठ्या प्रमाणात कोकणात जाणारी वाहने विचारात घेऊन सद्यस्थितीत पळस्पे ते वाकण या टप्प्यात अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. वाकण ते महाड टप्प्यात देखील काँक्रीटीकरणाचे काम सुरु आहे. त्याच बरोबर गणेशोत्सवाकरिता वाहनांची संख्या वाढणार आहे. या टप्प्यात देखील गरज भासल्यास अवजड वाहनांना बंदी करण्यात येऊ शकते. मात्र, त्याबाबतचा निर्णय योग्यवेळी होईल, अशी माहिती रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे.

सध्या मुंबई-गोवा महामार्गाच्या एक मार्गिकेच्या काँक्रीटीकरणाचे काम चालू आहे. गणेशोत्सव काळात भाविकांना चांगला रस्ता उपलब्ध व्हावा म्हणून या महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करणे गरजेचे आहे. त्याकरिता मुंबईकडून औद्योगिक कारखान्यांसमोर माल वाहतुकीचा मोठा प्रश्न आहे.

अवजड वाहनांना बंदी केल्याने कारखान्यांच्या उत्पादकतेवर विपरित परिणाम

रायगड जिल्हा हा औद्योगिक जिल्हा असून येथे तळोजा, पनवेल, पाताळगंगा, रोहा, विभागाड आणि महाड या एमआयडीसीच्या मोठ्या औद्योगिक वसाहती आहेत. दरवर्षी गणेशोत्सवाच्या आधीच्या पाच दिवसांपासून गणेशोत्सव संपेपर्यंत जड अवजड वाहनांना गेल्या १० ते १२ वर्षांपासून बंदी असते, त्याचा विपरित परिणाम कारखान्याच्या उत्पादकतेवर होत असतो. आता २७ ऑगस्टपासूनच जड अवजड वाहनांना बंदी केल्याने कारखान्यांच्या उत्पादकतेवर अधिक आणि मोठा विपरित परिणाम होणार असल्याची व्यथा रसायनी औद्योगिक क्षेत्रातील कारखाना संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने व्यक्त केली आहे.

गोव्याकडे जाणारी जड व अवजड वाहने २७ ऑगस्ट ते गणेशोत्सव संपेपर्यंत गोवा मार्गावर बंदी करुन पर्यायी मार्गांनी वळविण्यात यावी, अशी सुचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने राज्य शासनाला केली होती. त्यावर वाहतुक विभागाचे पोलीस अधिकारी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आर. बी. घोटकर, एक. के. कोरडे यांची एकत्रितपणे २३ ऑगस्ट रोजी बैठक घेऊन महामार्गाची पाहणी करुन त्यावर पनवेल शहर वाहतूक शाखेच्या हद्दीतून मुंबई-गोवा महामार्ग क्र. ६६ वर जाणारी जड- अवजड वाहतूक बंद करणे आवश्यक असल्याची शिफारस दिली आहे.

अवजड वाहनांना २७ ऑगस्ट ते २८ सप्टेंबरपर्यंत पूर्णपणे बंदी

त्यास अनुसरुन २७ सप्टेंबर १९९६ च्या अधिसूचनेनुसार मोटार वाहन कायद्यान्वये नवी मुंबई वाहतूक पोलीस विभागाचे पोलीस उपआयुक्त तिरुपती काकडे यांनी वाहतुकीचे योग्य ते व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने जड व अवजड वाहनांना पळस्पे ते वाकण या टप्प्यात ही बंदी लागू केली आहे. यंदा गणेशोत्सव सण पूर्ण होईपर्यंत ज्या वाहनांची वजन क्षमता १६ टन किंवा १६ टनापेक्षा जास्त आहे, अशी जड व अवजड वाहने, ट्रेलर, मल्टी एक्सल वाहने अशा सर्व प्रकारच्या वाहनांना २७ ऑगस्ट ते २८ सप्टेंबरपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे.

हेही वाचा 

Back to top button