मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्ग विभागाला कोर्टाच्या आदेशानंतर आली जाग! - पुढारी

मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्ग विभागाला कोर्टाच्या आदेशानंतर आली जाग!

महाड; श्रीकृष्ण द. बाळ : मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामास होणारा विलंब लक्षात घेऊन मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राष्ट्रीय महामार्ग विभागाने कार्यवाही करण्यास तातडीने प्रारंभ केला आहे. येत्या तीन आठवड्यांत महाड विभागातील नादुरुस्त रस्त्यामधील खड्डे भरण्याचे तर डिसेंबर अखेरपर्यंत या परिसरातील सर्व कामे पूर्ण करण्याची माहिती महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

मुंबई उच्च न्यायालयाने दाखल केलेल्या जनहित याचिकेची तातडीने दखल घेत मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या दुरावस्थेबाबत शासनाला तीन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून तातडीने कार्यवाही सुरू झाल्याचे काल झालेल्या प्रत्यक्ष भेटीदरम्यान निदर्शनास आले.

राष्ट्रीय महामार्ग विभागाअंतर्गत टेमपाले ते कशेडी बंगल्यापर्यंतचे काम तीन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले हाेते. दासगाव टोळ परिसरातील वनखात्याकडून परवानगी प्राप्त होण्याचा अपवाद वगळता बाकी सर्व ठिकाणी कामे ७० टक्क्यांपेक्षा जास्त पूर्ण झाले आहे, अशी  माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता महाडकर व कार्यकारी अभियंता बांगर यांनी दिली.

न्यायालयाच्या आदेशानुसार, येत्या तीन आठवड्यांत या विभागातील सर्व खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात येईल तसेच या महामार्गाचे काम दिलेले ठेकेदार लार्सन टुब्रो कंपनीकडून या मार्गाची पूर्ततः चालू वर्षाच्या डिसेंबर अखेरपर्यंत होईल, असेही ते म्‍हणाले.

मागील तीन वर्षांपेक्षा जास्त काळापासून या महामार्गाचे काम सुरू झाले असून महसूल विभागाकडून जमिनी प्राप्त केल्यानंतर काही प्रमाणात या कामांना वेग आला. मात्र, दासगाव टोळ परिसरातील वनखात्याच्या ताब्यात असलेल्या जमिनी अजूनही प्राप्त झालेल्या नाहीत.

काही ठिकाणी वैयक्तिक असलेले वादामुळे काम थांबले आहे.

येत्या काही दिवसांत शासकीय स्तरावर निकाल होऊन पूर्ण होईल, अशी माहिती या भेटीदरम्यान महामार्गाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

सुमारे दहा ते बारा वर्षांपूर्वी पनवेल ते इंदापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या कामास सुरुवात करण्यात आली होती.

मात्र, हा रस्ता अजूनही नादुरुस्त अवस्थेत असल्याचे वारंवार आढळून येते.

या संदर्भातदेखील केंद्र शासनाने हस्तक्षेप करीत संबंधित कामाची जबाबदारी अन्य ठेकेदाराकडे वर्ग केली होती.

महाड विभागाअंतर्गत येणाऱ्या टेमपाले ते कशेडी या मार्गावरील महाड ते पोलादपूर या मार्गाचे चौपदरीकरण मोठ्या वेगात जवळपास पूर्ण अवस्थेत आहे.

पोलादपूर शहरामधील अंडरपासचे काम देखील सुरु करण्यात आल्याची माहिती महामार्गाच्या या अधिकाऱ्यांकडून  देण्यात आली आहे.

एकूणच राष्ट्रीय महामार्गाच्या कामास होणारा विलंब लक्षात घेऊन मुंबई उच्च न्यायालयाने तातडीने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी महाड परिसरात प्रत्यक्षात सुरू झाल्याचे चित्र यासंदर्भात केलेल्या पाहणीदरम्यान आढळून आले आहे.

याशिवाय येत्या काही दिवसांत महाड परिसरातील राष्ट्रीय महामार्ग खड्डेमुक्त होईल अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button