चांद्रयान-3 : च्या यशस्वितेसाठी 'या' पाकिस्तानी महिलेची प्रार्थना
कराची: ‘चांद्रयान-3’ च्या यशस्वितेसाठी अवघ्या भारतवासीयांनी देव अक्षरश: पाण्यात ठेवणे बाकी होते, तर जगभराचेही भारताच्या या महत्त्वाकांक्षी मोहिमेकडे लक्ष लागून राहिले होते. देशभरात प्रार्थना, यज्ञ, होमहवन यथासांग होत होते. मात्र, यादरम्यान चक्क एक पाकिस्तानी महिला देखील चांद्रयानाच्या यशस्वितेसाठी प्रार्थना करताना दिसून आली आणि साहजिकच, या महिलेचे कौतुक होणे साहजिक होते. मात्र, नंतर ही महिला आणखी कोणी नसून, सीमा हैदर असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कौतुकाचे हातही आखडते घेतले गेले!
सीमा हैदर ही पाकिस्तानी महिला बेकायदेशीररीत्या भारतात आल्यानंतर बरीच प्रकाशझोतात आली. सध्या ती नोएडा येथे राहते. यादरम्यान तिने चांद्रयानाच्या यशस्वितेसाठी आपण पूर्ण दिवस उपवास केला. तसेच प्रार्थनाही केल्याचे सांगितले. याबाबत पोस्ट केला गेलेला व्हिडीओ बराच व्हायरल झाला.
या व्हिडीओत सीमा हैदर देवासमोर हात जोडून उभी असल्याची दिसून आले. माझी तब्येत सध्या बरी नाही. पण, तरीही मी चांद्रयानाच्या यशस्वितेसाठी दिवसभर उपवास केला. राधाकृष्णावर माझी विशेष भक्ती आहे आणि भविष्यात भारताला अशा मोहिमांत आणखी भरभरून यश मिळत राहील, असे ती म्हणाली.