इचलकरंजीकरांनी ‘सुळकूड’चे पाणी मागण्याचे धाडस करू नये : हसन मुश्रीफ | पुढारी

इचलकरंजीकरांनी ‘सुळकूड’चे पाणी मागण्याचे धाडस करू नये : हसन मुश्रीफ

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : इचलकरंजीला सुळकूड योजनेतून पाणी दिले जाणार नाही. त्यांनी वारणा अथवा कृष्णा नदीतून पाणी घेण्याचा विचार करावा. या योजनेला जनतेचा होणारा विरोध ध्यानात घेऊन इचलकरंजीकरांनी कागलचे पाणी मागण्याचे धाडस करू नये, असा इशारा वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी दिला. ही योजना रद्द करण्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेऊ, असेही त्यांनी सांगितले.

इचलकरंजीसाठी सुळकूड पाणी योजनेला मंजुरी मिळाली आहे. मात्र, त्याला कागल तालुक्यातून विरोध आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात दूधगंगा बचाव कृती समितीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला कागल पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दूधगंगा नदीचे पाणी वाचवण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून हा लढा सुरू आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या जमीन अधिग्रहण नोटिसीने तो आणखी तीव्र झाल्याचे सांगत मुश्रीफ म्हणाले, यापूर्वी इचलकरंजी शहराला विविध योजनांतून पाणीपुरवठा करण्याचा निर्णय झाला होता; पण त्याला यश आले नाही. इचलकरंजीसाठी ही चौथी योजना आहे. कृष्णा नदीतील पाणी प्रदूषित असल्याचे सांगत इचलकरंजीकरांनी त्याला विरोध केला होता; मग अतिरिक्त पाणी असताना वारणा नदीतून पाणी का घेतले नाही, असा सवाल मुश्रीफ यांनी केला.

भविष्यात पाण्याची गरज वाढणार आहे, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सुळकूडमधून पाणी दिले जाणार नाही, कागलकरांचा विरोध ध्यानात घ्यावा आणि इचलकरंजीकरांनी इकडे येऊच नये. त्यांना वारणा आणि कृष्णा हा चांगला पर्याय आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत बैठक घेऊन ही योजनाच रद्द करण्याचे आदेश काढले पाहिजेत, असे सांगत मुश्रीफ म्हणाले, काळम्मावाडी धरणाची गळती कमी करण्यासाठी साडेसहा टीएमसी पाणी सोडून दिले. पाऊस लांबल्याने टंचाई निर्माण झाली होती. गळती काढण्यासाठी कोणतीही तरतूद नाही, त्याबाबत नियोजन करण्याची बैठकीत मागणी केली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

भाजप नेते समरजित घाटगे म्हणाले, सुळकूड योजनेवर मोठा निधी खर्च होणार आहे. कृष्णा नदीतून पाणी नेल्यास हा खर्च कमी होणार आहे. निधीही कमी लागणार आहे. इचलकरंजीकर आता किती पाणी लागेल हे सांगत आहेत. मात्र, भविष्यात त्यांना त्यापेक्षा किती तरी जादा पाणी लागणार आहे. यामुळे हा धोका ओळखून आताच विरोध केला पाहिजे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे योजना रद्द करण्याची आपण मागणी करू, असेही त्यांनी सांगितले.

खासदार संजय मंडलिक म्हणाले, या धरणाच्या लाभ क्षेत्रातील नागरिकांनाच पुरेसे पाणी मिळत नाही; मग दुसरीकडे पाणी देण्याचा प्रश्नच येत नाही. ज्यांच्यासाठी धरण झाले, त्यांना पाणी मिळाले पाहिजे. इचलकरंजी नवी महापालिका आहे, भविष्यात विविध योजनांतून त्यांना पाणी देता येईल; पण आता त्यांनी हट्ट करू नये; अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला. माजी आ. संजय घाटगे म्हणाले, मूळ आराखड्यात इचलकरंजीचा समावेश नाही. त्यामुळे पाणी देण्याचा प्रश्न येतच नाही. माजी आ. के. पी. पाटील यांनी इचलकरंजीला पाणी न देण्याच्या लढ्यात सोबत असल्याचे सांगितले.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, या योजनेबाबत विरोध करणार्‍यांच्या भावना शासनाला कळवल्या जातील. यावेळी सध्याचे काम तत्काळ बंद करा, अशी उपस्थितांनी मागणी केली. त्यावर शासन निर्णय असल्याने त्या कामाला स्थगिती देता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीला वीरेंद्र मंडलिक, अमरिश घाटगे आदींसह नागरिक उपस्थित होते.

सत्तेच्या हट्टासाठी वाद नको

इचलकरंजीकरांनी सुळकूड योजनेतूनच पाणी मिळवण्याचा हट्ट करू नये. हट्ट करण्याचे प्रकार आहेत, एक राज हट्ट, दुसरा स्त्री हट्ट, तिसरा बाल हट्ट आणि चौथा सत्तेचा हट्ट. या चौथ्या हट्टासाठी वाद होता कामा नये, असा सल्ला संजय घाटगे यांनी दिला.

मी काय बोलू : मुश्रीफ

‘ईडी’च्या कारवाईला घाबरून आपण भाजपमध्ये गेला, असे एका दैनिकाने अग्रलेखात उल्लेख केला आहे. याबाबत विचारता मी तो पेपर वाचत नाही, आणि त्यांच्या त्याच त्याच वक्तव्यावर काय बोलू, असा प्रतिसवाल मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी आता कोणी राष्ट्रवादी सोडून जाणार नाही, असे सांगितले आहे, त्यात किती तथ्थ आहे, असे विचारताच ते शरद पवार यांना विचारूनच सांगतो, अशी मिश्कील टिप्पणीही त्यांनी केली.

मुश्रीफ राज्याचे की, कागलचे मंत्री

इचलकरंजी : पिण्याच्या पाण्याला नाही म्हणणार नाही, असा शब्द ज्यांनी दिला, ज्यांच्याच कार्यकाळात या योजनेला शासनाने मंजुरी दिली, तेच मुश्रीफ आता शब्द फिरवत आहेत, ते राज्याचे की कागलचे मंत्री आहेत, असे सवाल करणार्‍या विविध पोस्ट व्हायरल करत इचलकरंजीकरांनी शनिवारी सुळकूड योजना बैठकीतील मुश्रीफ यांच्या व्यक्तव्यावरून संताप व्यक्त केला. पाणी देणार नसाल तर इचलकरंजीचा कर्नाटकात समावेश करा, अशाही पोस्ट नागरिकांनी व्हायरल केल्या. दरम्यान, मंगळवारी इचलकरंजीच्या सर्व पक्षीय शिष्टमंडळाद्वारे जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन त्यांना परिस्थिती पटवून दिली जाईल, असे खासदार धैर्यशील माने यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी झालेल्या बैठकीत मंत्री मुश्रीफ यांनी इचलकरंजीकरांनी सुळकूड मधून पाणी मागण्याचे धाडस करू नये, असे व्यक्तव्य केले. ही माहिती समजताच, विविध स्तरातून प्रतिक्रीया व्यक्त करण्यात आल्या. इचलकरंजीला पाणी देण्यास विरोध करणार्‍या मंत्री मुश्रीफ यांना इचलकरंजी शहरात येण्यास बंदी करा, इचलकरंजीच्या खासदार, आमदारांनी राजीनामा द्या आदी मागण्याही समाजमाध्यमावरून करण्यात आल्या. या योजनेचे काम गतीने पुढे नेण्यास शहरातील राजकीय नेते कमी पडले, अशा टीकाही करण्यात येत होत्या.

शहराला सध्या 54 एमएलडी पाण्याची गरज आहे. मात्र, जेमतेम 30 ते 35 एमएलडी पाण्याचा सध्या पुरवठा होत आहे. दिवसेंदिवस शहराचे औद्योगिकीकरण, नागरिकीकरण वाढत आहे. त्यामुळे भविष्यातील लोकसंख्येचा विचार करून सुळकूड योजना मार्गी लागणे इचलकरंजीसाठी महत्वाची आहे. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत लोकप्रतिनिधींनीच विरोध केल्याने या योजनेचे भविष्य पुन्हा अधांतरीत झाले असून हा प्रश्न ऐन पावसाळ्यात पेटण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सुळकूड योजनेला केंद्र व राज्य शासनाचा निधी मंजूर आहे. त्यामुळे फक्त राजकीय लाभासाठी विरोध नको. या योजनेमुळे नदी प्रवाहित राहणार असून त्याचा फायदा कागल तालुक्यातील नदीकाठावरील गावातील सर्वांनाच होणार आहे. पिण्याच्या पाण्यासाठी कोणतीही टोकाची भूमिका न घेता, चर्चा करून समन्वयाने हा प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासमवेत इचलकरंजी, कागल लोकप्रतिनिधींनीची संयुक्त बैठक घेऊन शंकाचे निरसन करून देऊ, असे खासदार धैर्यशील माने यांनी सांगितले.

कोल्हापूरला काळम्मावाडीतून पाणी देण्यात आले, इचलकरंजीलाही शिल्लक साठ्यातूनच पाणी मिळणार आहे, यापूर्वी मंत्री मुश्रीफ, खा. मंडलिकयांनी पिण्याच्या पाण्याला नाही म्हणणार नाही असा शब्द दिला होता, यामुळे या योजनेचा विरोध करू नका, असे आवाहन माजी नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी केले. इचलकरंजीला सध्या केवळ 60 ते 70 एमएलडी पाण्याची गरज आहे. तीस वर्षांनंतर ती 1 टीएमसी पाणी लागणार आहे. हे पाणी दिल्यानंतरही धरणात 2 टीएमसी पाणी शिल्लक राहणार आहे. कागल, राधानगरी, भुदरगड येथील सुमारे 50 हजार लोक इचलकरंजीत व्यवसाय, व्यापार, नोकरीनिमित्त येत असतात त्यामुळे पाण्यासाठी विरोध करू नका, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे यांनी केले.

पिण्याच्या पाण्यात राजकारण नको, इचलकरंजीला स्वच्छ व मुबलक पाणी मिळणे गरजेचे आहे. संवदेनशील मनाने या गोष्टीचा विचार करावा, इचलकरंजीच्या पाण्यासाठी कागलच्या नेत्यांनी पुनर्विचार करावा असे काँग्रेसचे माजी नगरसेवक राहूल खंजीरे यांनी सांगितले. मंत्री मुश्रीफ यांच्याच मार्गदर्शनाखाली ही योजना मंजूर झाली होती. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर मुश्रीफ यांनी भूमिका बदलली. मुंबईत शुक्रवारी विद्यमान आमदारांनी समन्वयक आ. लाड यांना पत्र दिल, तर शनिवारी कागलमधील नेत्यांनी योजनेला विरोध दर्शविला, हे सर्व काही ठरवून चालले आहे का, असा सवाल काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावचकर यांनी केला.

Back to top button