जालना : सुळकूडच्या स्टील व्यापारी पिता-पुत्राला जालन्यात अटक | पुढारी

जालना : सुळकूडच्या स्टील व्यापारी पिता-पुत्राला जालन्यात अटक

जालना, पुढारी वृत्तसेवा : अतिरिक्त औद्योगिक वसाहतीतील कालिका व मेटारोल स्टील कंपनीची साडेतीन कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी कोल्हापूरच्या सुधाकर शिवराम सुळकुडे (वय 60) व स्वप्निल सुधाकर सुळकुडे (35, दोघेही रा. सुळकूड, ता. कागल) या व्यापारी पिता-पुत्राला चंदनझिरा पोलिसांनी अटक केली. त्यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. याप्रकरणी बेळगावच्या राहुल वीराना बागेवाडी व ज्योत्स्ना शिवाजी पवार या आणखी दोघांवर दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत.

सुळकुडे यांनी करवीर ट्रेडर्सच्या नावे, तर त्यांच्याच ओळखीतून बागेवाडी आणि पवार हे विहान इंडस्ट्रीजच्या नावे कालिका स्टील कंपनीतून 2021 पासून लोखंडी सळई उधारीवर घेऊन जातात. सुळकुडे यांनी आतापर्यंत 2 कोटी 8 लाख 92 हजार 874 रुपयांची, तर बागेवाडी आणि पवार यांनी 20 लाख 59 हजार 267 रुपयांची सळई खरेदी केली आहे. याबाबत मुदतीत पैसे दिले नाहीत. वारंवार फोन करूनही त्याला दाद देत नसल्याने कालिका स्टील कंपनीचे लेखनिक सुनील सुभाषचंद्र सोनी यांनी चंदनझिरा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

मेटारोल कंपनीचीही फसवणूक झाल्याने कंपनीच्या रामचंद्र शिंगणे यांनीही तक्रार दिली आहे. तुळजाभवानी स्टीलच्या नावे सुधाकर सुळकुडे व त्यांचा मुलगा स्वप्निल याने कंपनीकडून एक कोटी 41 लाख 21 हजार 446 रुपयांची स्टील सळई खरेदी केली. मात्र, ती रक्कम न देता कंपनीची फसवणूक केल्याने याप्रकरणी पिता-पुत्रावर गुन्हा दाखल होताच, चंदनझिरा पोलिसांनी सुधाकर सुळकुडे व स्वप्निल सुळकुडे या पिता-पुत्रास अटक केली असून, त्यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली.

Back to top button