iPhone : आयफोन घेण्यासाठी आईने 8 महिन्याच्या बाळाला विकले! | पुढारी

iPhone : आयफोन घेण्यासाठी आईने 8 महिन्याच्या बाळाला विकले!

पुढारी ऑनलाईन डेस्क : iPhone : पश्चिम बंगालमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका जोडप्याने आयफोन घेण्यासाठी चक्क आपल्या आठ महिन्यांच्या बाळाला विकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या जोडप्याला इंस्टाग्राम रील्स बनवण्यासाठी आयफोन घ्यायचा होता त्यामुळे त्यांनी आपल्या बाळाचा सौदा केल्याचे समोर आले आहे.

रिपोर्टनुसार, आरोपी महिला आणि तिचा पती पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील पानिहाटी येथील रहिवासी आहेत. या जोडप्याची आर्थिक स्थिती चांगली नाही. मजुरी करूनच त्यांना उदरनिर्वाह करावा लागतो. अशातच त्यांच्याकडे अचानक महागडा आयफोन आला. हे पाहून त्यांचे शेजारचे लोक आश्चर्यचकित झाले. आरोपी महिला रील बनवण्यासाठी अनेक ठिकाणी फिरत होती. त्यामुळे तिच्यावरचा संशय बळावला. शेजारील लोकांच्या लक्षात आले की त्यांचे आठ महिन्याचे बाळ कुठेच दिसत नाहीय. त्यामुळे त्यांनी या जोडप्याला त्यांच्या मुलाबाबत विचारले मात्र त्यांनी स्पष्टपणे काहीही सांगितले नाही.

शेजाऱ्यांच्या दबावानंतर या जोडप्याने पैशांसाठी बाळाचा सौदा केल्याचा खुलासा केला. एका जोडप्याने मूल विकत घेतले आणि त्या बदल्यात त्यांना पैसे दिले. यानंतर पोलिसांनी खर्डा येथे राहणाऱ्या महिलेकडून बाळाची सुटका केली. याबाबत पोलिसांनी माध्यमांना फारशी माहिती दिली नाही. पुढील तपासानंतरच या प्रकरणाची संपूर्ण माहिती समोर येईल. दरम्यान, बाळाची आई आणि बाळ विकत घेणा-या महिलेला अटक केली असून बाळाचा बाप फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

अशी पकडली गेली आरोपी आई

वास्तविक, आरोपी महिला तिचा पती आणि सासरच्यांसोबत पाणिहाटी गांधीनगरमध्ये राहते. तिचे नाव साथी कनई असून तिच्या पतीचे नाव जयदेव आहे. त्यांना सात वर्षांची मुलगी आणि आठ महिन्यांचा मुलगा आहे. शनिवारी आरोपी महिलेचा सासू आणि सासऱ्यांसोबत काही गोष्टीवरून वाद झाला. त्याचे पर्यवसन मारहाणीत झाले. त्यानंतर पोलिसांनी महिलेच्या सासू आणि सासऱ्यांना अटक केली. दरम्यान, आजूबाजूच्या लोकांनी पाहिले की महिलेच्या हातात एक महागडा आयफोन होता आणि मूल कुठेच दिसत नव्हते. यानंतर लोकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली.

याप्रकरणी स्थानिक नगरसेवक तारक गुहा यांनी सांगितले की, 8 महिन्यांच्या बाळाची विक्री केल्यानंतर आरोपींनी शनिवारी मध्यरात्री मुलीलाही विकण्याचा प्रयत्न केला. ही बाब लोकांना समजताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली. सध्या आरोपींना अटक करण्यात आली आहे. गरिबीमुळे बाळाची विक्री झाली की नाही, याचा शोध पोलीस करत आहेत.

 

Back to top button