ICC Test Ranking : रोहित टॉप-10 मध्ये कायम! सिराजला जबरदस्त फायदा | पुढारी

ICC Test Ranking : रोहित टॉप-10 मध्ये कायम! सिराजला जबरदस्त फायदा

पुढारी ऑनलाईन डेस्क : ICC Test Ranking : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बुधवारी कसोटी खेळाडूंची ताजी क्रमवारी जाहीर केली. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा फलंदाजांच्या यादीत टॉप-10 मध्ये कायम असून तो दहाव्या स्थानावर आहे. त्याचे रेटिंग 750 आहे. गेल्या आठवड्यात त्याने टॉप-10 मध्ये प्रवेश केला होता. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत शतक झळकावणाऱ्या रोहितने दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात 80 आणि दुस-या डावात 67 धावा केल्या. पावसामुळे सामना अनिर्णित राहिला. मात्र, भारताने ही मालिका 1-0 अशी जिंकली.

दुसरीकडे, अनुभवी फलंदाज विराट कोहलीने 22 रेटिंगची कमाई केली आहे. तो (733 रेटिंग) 14 व्या क्रमांकावर आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत कोहलीने शतक झळकावले. 211 चेंडूंचा सामना करत त्याने 11 चौकारांच्या मदतीने 121 धावा फटकावल्या. पाकिस्तानी फलंदाज सौद शकीललाही चांगला फायदा झाला आहे. तो 12 स्थानांची झेप घेत 15व्या स्थानावर पोहोचले आहे. त्याला करिअरमधील सर्वोत्तम रेटिंग (691) मिळाले आहे. शकीलने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत द्विशतक झळकावले होते. (ICC Test Ranking)

Pudhari Cricket WhatsApp Group

इंग्लंडचा माजी कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज जो रूट (852 रेटिंग) तीन स्थानांनी वर आला आहे. तो आता तिसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या ॲशेस कसोटीत त्याने 84 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. इंग्लंडचा हॅरी ब्रूक (748 रेटिंग) 11व्या, जॅक क्रॉली (596 रेटिंग) 35व्या आणि ऑस्ट्रेलियाचा मार्नस लॅबुशेन (852 रेटिंग) दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. न्यूझीलंडच्या केन विल्यमसनने (883 रेटिंग) आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे. (ICC Test Ranking)

भारताच्या मोहम्मद सिराजने कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत मोठी प्रगती केली आहे. विंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात 5 बळी घेण्याचा त्याला जबरदस्त फायदा झाला आहे. सिराजने कारकिर्दीतील नवे सर्वोच्च स्थान मिळवले असून सहा स्थानांची झेप घेत तो 33व्या क्रमांकावर पोहोचला. त्याच्या खात्यात 560 रेटिंग जमा झाले आहेत. पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज नसीम शाह (44 वे स्थान) आणि फिरकी गोलंदाज अबरार अहमद (12 वे स्थान) देखील फायदा झाला आहे. टीम इंडियाचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (879 रेटिंग) अव्वल स्थानावर आहे.

यशस्वी जैस्वालने घेतली 11 स्थानांची झेप

बराच काळ अव्वल 10 मध्ये असलेला ऋषभ पंत आधी 11 आणि आता 12 व्या क्रमांकावर घसरला आहे. दरम्यान, पहिल्या दोन कसोटीत शानदार फलंदाजी करणाऱ्या यशस्वी जैस्वालला याचा जबरदस्त फायदा झाला आहे. गेल्या आठवड्यात त्याचे रेटिंग 420 होते, ते आता 466 पर्यंत वाढले आहे. त्याने 11 स्थानांची झेप घेतली असून आता तो 63 व्या स्थानावर पोहोचला आहे.

Back to top button