समृद्धीवर वाहनास शंभर किलोमीटर अंतरावर थांबा द्यावा; खासदार रामदास तडस | Samriddhi Highway | पुढारी

समृद्धीवर वाहनास शंभर किलोमीटर अंतरावर थांबा द्यावा; खासदार रामदास तडस | Samriddhi Highway

वर्धा; पुढारी वृत्तसेवा : समृध्दी महामार्गासोबतच इतर महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढत असून जिवित हानी होत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी संबंधित यंत्रणांनी रस्ते सुरक्षा उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन महामार्गावरील सुरक्षा तसेच अपघात रोखण्यासाठी उपाययोजना कराव्या. समृध्दी महामार्गावर शंभर किलोमीटर अंतरावर थांबा द्यावा, अशा मागणी खासदार रामदास तडस यांनी केल्या.
खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली संसद सदस्य रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. बैठकीला आ.डॉ. पंकज भोयर, आ.दादाराव केचे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, अपर पोलिस अधीक्षक सागर कवडे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी मो. समिर मो.याकुब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल भोसले, शहर वाहतुक शाखेचे पोलिस निरिक्षक, समितीचे अशासकीय सदस्य प्रणय जोशी, राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील निश्चित करण्यात आलेल्या ३२ अपघात प्रवणस्थळावर फलक तसेच रबलिंग स्ट्रप्स, अपघात प्रवणस्थळ फलक, वेगमर्यादा फलक, रस्त्याचे वळण रुंद करणे अशा विविध उपाययोजना करण्याच्या सूचना खासदार रामदास तडस यांनी केल्या. परिवहन विभागांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी स्कूल बसेसची नियमित तपासणी करुन वाहनाची वेगमर्यादा निश्चित करुन द्यावी. त्याचबरोबर चालकांना वाहतुक सुरक्षेबाबत समुपदेशन करावे. महामार्गावर अपघात झाल्यास  अपघातग्रस्ताला तात्काळ आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी यंत्रणा सुसज्ज ठेऊन अपघातग्रस्तांना मदत करणार्‍या व्यक्तींना समिती मार्फत प्रोत्साहन द्यावे.
वाहन चालविणा-या खाजगी तसेच इतर सर्व वाहकांसाठी वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहन चालकांची नियमित आरोग्य तपासणी, प्रबोधन व समुपदेशन करण्याकरीता उपक्रम राबविण्याच्या सुचना देखील खा. तडस यांनी केल्या.
समृध्दी महामार्गावर वाहन चालविताना वाहन चालकांनी सलग वाहन न चालविता १०० किमी अंतरावर थांबा घेण्यासाठी परिवहन विभागांनी वाहन चालकास सूचना द्याव्या, असेही खा. रामदास तडस म्हणाले.
महामार्गावरुन धावणाऱ्या खाजगी बसेस काटेकोरपणे तपासणी करुन प्रवासाचे आरक्षण करतांना प्रवाशांचे पूर्ण नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक नमुद असावे. याबाबत कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. यावेळी समृध्दी महामार्गावर सिंदखेड येथे झालेल्या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींना श्रध्दांजली वाहण्यात आली.

Back to top button