जनगणना यावर्षीही रखडणार | पुढारी

जनगणना यावर्षीही रखडणार

कोल्हापूर, अनिल देशमुख : देशाची 16 वी जनगणना यावर्षीही रखडली आहे. जनगणेनसाठी सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी किमान एक ते दीड वर्षापेक्षा अधिक कालावधी लागतो. त्यातच यावर्षी काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका आहेत. पुढील वर्षी लोकसभा निवडणूक होणार आहे. यामुळे 2024 मध्येही जनगणनेचे काम पूर्ण होईल, याची शक्यता कमीच आहे.

देशाची 16 वी जनगणना मार्च 2021 अखेर पूर्ण होणार होती. त्याचे काम 2019 पासून सुरू झाले होते. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने जनगणनेचे काम फेब—ुवारी 2020 पासून ठप्प झाले आहे. तीन वर्षे उलटली तरी, अद्याप जनगणनेच्या कामाच्या हालचाली जिल्ह्याच्या प्रशासकीय पातळीवर सुरू झालेल्या नाहीत.

जनगणनेचे काम किमान वर्ष-दीड वर्षे चालते. प्रत्यक्ष जनगणनेपूर्वी अधिकारी, कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण, घरयादी, घरगणना याकरिता सुमारे आठ-दहा महिन्यांचा कालावधी लागतो. सध्या पावसाचे दिवस आहेत. यानंतर निवडणुकांची धामधूम सुरू होईल. यामुळे जनगणनेचे प्राथमिक काम यावर्षी सुरू होईल, याचीही शक्यता कमीच आहे.

प्रथमच डिजिटल स्वरूपात जनगणना

देशाची 16 वी जनगणना यापूर्वीच्या निर्णयानुसार प्रथमच डिजिटल स्वरूपात होणार आहे. मोबाईल अ‍ॅप आणि पत्रकांवर माहिती, अशा दोन पद्धतीने जनगणना होईल.

पहिल्या टप्प्यात वॉर्ड, विभाग, गाव, शहरनिहाय घरयाद्या तयार करणे आणि घरगणना करण्यात येईल, दुसर्‍या टप्प्यात प्रत्यक्ष माहिती मोबाईल अ‍ॅप व पत्रकांत भरली जाणार आहे. डिजिटल जनगणनेमुळे प्रगणकांना आता पारंपरिक जाडजूड पुस्तके घेऊन फिरावेे लागणार नाही.

जनगणनेचे वैशिष्ट्य

देशात दर दहा वर्षांनी जनगणना होते. 1872 नंतरच्या अखंड साखळीतील ही सलग 16 वी व स्वातंत्र्यानंतरची 8 वी जनगणना आहे. ती 2021 ला पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. जनगणना ही जगातील सर्वात मोठी प्रशासकीय आणि सांख्यिकी स्तरावरची अभ्यास प्रक्रिया आहे. त्याचा आकडेवारीवरच देशाचे नियोजन ठरते. जनगणनेचा भारतीय राज्यघटनेच्या सातव्या परिशिष्टातील अनुक्रमांक 69 नुसार कलम 246 अंतर्गत समावेश आहे. जनगणनेचे काम ‘जनगणना कायदा 1948’ नुसार चालते. लोकसंख्या वैशिष्ट्यांवरील माहिती ती एक विश्वसनीय स्रोत आहे.

जनगणनेत 34 प्रश्नांची होणार विचारणा

यावर्षीच्या जनगणनेत 34 प्रश्नांची विचारणा केली जाणार आहे. यामध्ये स्मार्टफोन वापर, लॅपटॉप वापराबाबतही माहिती विचारली जाणार आहे. जातनिहाय जनगणना व्हावी, अशी मागणी सातत्याने होत आहे. मात्र, त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

Back to top button