कोकणात 10 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ | पुढारी

कोकणात 10 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा :  कोकणासह, घाटमाथ्यावर असलेल्या पावसाचा जोर कायम राहण्याचे संकेत आहेत. शुक्रवारपासून 10 जुलैपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तण्यात आली असून, रत्नागिरीसह रायगड आणि पालघर जिल्ह्यात ‘ऑरेंज अलर्ट’ कायम करण्यात आला आहे तर ठाणे, आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

दरम्यान, शक्रवारी रत्नगिरी जिल्ह्यात पाच तालुक्यात 100 मि.मी. पेक्षा जास्त पावसाची नंद झाली. तर मंडणगड तालुक्यात सर्वाधिक 140 मि.मी पावसाची नोंद झाली. गेले दोन दिवस पावसाच्या सातत्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्याच्या जलस्तरात वाढ झाली असून जगबुडी नदी इशारा पतळीकडे झेपावल्याने परिसरातील गावांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.

मोसमी पावसाचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकला असल्याने आणि पश्चिम किनार्‍याला समांतर कमी दाबाचा पट्टा दक्षिण गुजरातपासून केरळ किनारपट्टीपर्यंत सक्रीय असल्याने कोकण किनारपट्टी भागात पावसाचा जोर वाढल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे गुरूवारप्रमाणेच शक्रवारीही सकाळपासूनच रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार वृष्टी सुरूच आहे. शुक्रवारी सकाळी 11 वाजता खेडमधील जगबुडी नदीची पाणीपातळी धोका पातळीपेक्षा फक्त 0.25 मी कमी म्हणजेच 6.75 मीटर एवढी नोंदवली गेली आहे. आज सकाळी 8.30 वाजता संपलेल्या 24 तासांत मंडणगडमध्ये सर्वाधिक 140 मिमी पावसाची नोंद झाली.
दापोली तालुक्यात 105 मि. मी. पावसाची नोंद झाली. शुक्रवारी रत्नागिरी जिल्ह्यात 90 मि.मी.च्या सरासरीने एकूण 811 ंमि.मी. पाऊस झाला. यामध्ये खेड 64, मि. मी, गुहागर 45, चिपळूण 98, संगमेश्वर 54, रत्नागिरी 75, लांजा 90 आणि राजापूर तालुक्यात 110 मि.मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात आतापर्यंत साडेआठशे मि.मी. च्या सरासरीने 7610 मि.मी. एकूण पाऊस झाला आहे. दरम्यान मोसमी पाऊस जुलै मध्ये सक्रीय झाला असल्याने खरिपातील भात लागवडीच्या कामांना वेग आला आहे.

जोरदार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलेले जिल्हे

ऑरेंज अलर्ट ः पालघर, रायगड, रत्नागिरी ,पुणे, सातारा
यलो अलर्ट ः ठाणे मुंबई , सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूर, अमरावती
विजांसह जोरदार पाऊस ः बुलडाणा, अकोला, वाशिम, नागपूर, भंडारा गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

Back to top button