‘ती’ जिद्दीने झाली ‘पीएसआय’; देहरे येथील सुवर्णा काळे हिची संघर्षमय कहाणी | पुढारी

‘ती’ जिद्दीने झाली ‘पीएसआय’; देहरे येथील सुवर्णा काळे हिची संघर्षमय कहाणी

ज्ञानदेव गोरे : 

वाळकी : वडिलांचे छत्र हरपले, त्यापाठोपाठ एकुलता एक भाऊसुद्धा जग सोडून गेला. दोन्ही कर्ते पुरुष गेल्यावर आईच्या साथीने संघर्ष करत जिद्द अन् कठोर परिश्रमांच्या बळावर नगर तालुक्यातील देहरे येथील सुवर्णा भगवान काळे हिने ‘एमपीएससी’ परीक्षेत उज्ज्वल यश मिळवून पोलिस उपनिरीक्षकपदाला गवसणी घातली. सुवर्णाचं स्टेटस कायम असायच की, ‘नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळवण्याची जिद्द असावी’ तिने ते खरं करून दाखवल. सुवर्णाचा जन्म सधन शेतकरी कुटुंबात झालेला. परंतु, नियतीला आणि त्या विधात्याला ते मान्य नव्हतं, म्हणून तिच्या वाट्याला सतत संघर्ष अन् दुःखच आलं.

दहावीमध्ये ती नापास होऊनही तिने जिद्द सोडली नाही. मधल्या काळात वडिलांचे छत्र हरपलं. यानंतर सुद्धा ती लढत राहिली. दोन मोठ्या बहिणींचे लग्न, घरातील बाकी जबाबदार्‍या पार पाडत राहिली. सुवर्णाचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण गावातच झाले. कोरोनात एकुलत्या एक भावाचेही छत्र हरपल. न डगमगता तीने परिस्थितीशी झगडनं सुरूच ठेवल. आईचा तिला आधार अन् पाठिंबा होताच अन् संस्कारही व जोडीला स्वतः तिची जिद्द. स्वतः शेतामध्ये आईला हातभार लावून, तर कधी अध्यापनाचे काम करून तिने आपला संघर्ष चालू ठेवला. काही काळ तिने पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसी तील कंपनीत नोकरी केली. रांजणगाव येथील महागणपती करिअर अकॅडमीत अध्यापन केले. तेथेच प्रा.धैर्यशील नाकाडे, तानाजी मोरे यांनी तिला मार्गदर्शन केले. आज ती जिंकलीय. ते गेलेलं वैभव तिने पुन्हा मिळविले.

दहावीत नापास अन् पुढे हिंदीत सुवर्ण
नवभारत विद्यालयात दहावीच्या परीक्षेत ती गणित विषयात नापास झाली. मात्र, खचून न जाता तिने पुढे प्रचंड मेहनत घेत नगरच्या न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये एम.ए.ही पदवी मिळविली. यात हिंदी साहित्य विषयात सुवर्ण पदक मिळवून ती पुणे विद्यापीठात पहिली आली, ही तिची जिद्द. नंतर तीने बी.एड. केलं.

Back to top button