पवारांचा उठाव आणि आमची गद्दारी, असे कसे होईल? : दीपक केसरकर | पुढारी

पवारांचा उठाव आणि आमची गद्दारी, असे कसे होईल? : दीपक केसरकर

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : शरद पवारांनी ज्या पद्धतीने उठाव केला त्याला जनतेने स्वीकारले. त्यांचा उठाव आणि आमची गद्दारी, असं कसं होईल, असा सवाल करत एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील, असा विश्वास पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. आषाढी एकादशी आणि ईद एकाच दिवशी हा योगच असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रतिपंढरपूर अशी ओळख असलेल्या नंदवाळ (ता. करवीर) येथे विठुरायाच्या दर्शनासाठी केसरकर आले होते. पक्ष संपवण्याचा प्रयत्न झाला म्हणून उठाव झाला. महाराष्ट्राच्या इतिहासात हे फक्त दोनदा घडले. पवार उठावानंतर चार वेळा मुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदे सुद्धा पुन्हा मुख्यमंत्री होतील. फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढणार असे म्हणत होेते. त्यापूर्वी शिंदे यांनी फडणवीस यांना मुख्यमंत्री व्हा, असे म्हटले होते. काही तडजोड असू शकतात. मुख्यमंत्री कोण होणार, हे दोघांनी मिळून ठरवायचे. आम्ही दोघांचे नेतृत्व मान्य करतो. मोठ्या पक्षाची फरफट झाली. मूळ पक्ष बाजूला गेला. अनेक वर्षे नेतृत्व करणारी माणसे बाजूला गेली याचे आम्हालाही दु:ख असल्याचेही त्यांनी सांगितले.

औटघटकेचे सरकार म्हणणारे संजय राऊत कोण आहेत, असा सवाल करत केसरकर म्हणाले, त्यांना फारसे सिरियस घेऊ नका. एखाद्या नगरपालिकेचा आणि समान नागरी कायद्याचा संबंध असू शकतो का? राऊत हे कोणताही विचार न करता बोलणारे व्यक्तिमत्त्व आहे.

कायदे मंडळात असल्याने त्याला संरक्षण आहे. दुसरा कोणी बोलला असता, तर तो जेल मध्ये असता. भारत-पाकिस्तान फाळणीसुद्धा धर्माच्या आधारे झाली. मुस्लिम स्वतंत्र देश म्हणून जाहीर झाला; पण भारताने हिंदू राष्ट्र म्हणून जाहीर केले नाही. सर्वधर्मसमभावाचा हा देश आहे. सर्वांना समान न्याय असला पाहिजे असे समान नागरी कायद्याची अधिसूचना आल्यावर राऊत त्यावर आक्षेप पाठवू शकतात, असेही त्यांनी सांगितले.

Back to top button