नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत प्रत्यक्ष करात 36 टक्क्यांची वाढ! | पुढारी

नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत प्रत्यक्ष करात 36 टक्क्यांची वाढ!

कोल्हापूर, राजेंद्र जोशी : चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये शासनाच्या तिजोरीमध्ये प्रत्यक्ष कराच्या भरण्याने मोठी भरारी घेतली आहे. 1 एप्रिल ते 15 जूनअखेर अग्रीम करासह (अ‍ॅडव्हान्स टॅक्स) गतवर्षीच्या तुलनेत प्रत्यक्ष कराच्या महसुलामध्ये तब्बल 36 टक्क्यांची वाढ नोंदविली गेली आहे. यामुळे चालू आर्थिक वर्षातही प्रत्यक्ष कराचा महसूल अर्थसंकल्पीय उद्दिष्टाला लिलया मागे टाकून पुढे जाईल, असे प्राथमिक अनुमान कर अभ्यासकांतून व्यक्त केले जात आहे.

गत आर्थिक वर्षामध्ये प्रत्यक्ष कराचा निव्वळ महसूल 16 लाख 61 हजार कोटी रुपये इतका जमा झाला होता. 2021-22 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ही वाढ तब्बल 18 टक्क्यांची असल्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाचे म्हणणे आहे. तथापि, केंद्रीय पातळीवर अद्याप याची समग्र आकडेवारी उपलब्ध झालेली नाही. तरीही गतवर्षीचा विक्रम मोडीत काढून यंदा प्रत्यक्ष कराच्या महसुलाचा नवा विक्रम प्रस्थापित होईल, असे चित्र आहे.

देशात प्रत्यक्ष कराच्या आकारणीमध्ये व्यक्तीगत वा कार्पोरेट करदात्यांकडून प्रतिमहिना करदात्याची कराची कपात (टॅक्स डिडक्टेड अ‍ॅट सोर्स) केली जाते. शिवाय, लेखापरीक्षित व्यावसायिकांसाठी त्यांच्या एकूण वार्षिक कराच्या रकमेचे चार टप्पे पाडून प्रत्येक तिमाहीमध्ये प्रत्येकी 25 टक्के कर सरकारी तिजोरीत भरण्याचा दंडक आहे. यंदा पहिल्या तिमाहीमध्ये व्यक्तिगत कराच्या रूपाने दोन लाख 25 हजार कोटी, तर कार्पोरेट टॅक्सच्या रूपाने 1 लाख 86 हजार कोटी रुपयांचा महसूल 15 जूनपर्यंत सरकारी तिजोरीत जमा झाला आहे.

यापैकी हा एकत्रित महसूल 4 लाख 17 हजार कोटी रुपये इतका आहे. यातील 39 हजार कोटी रुपयांच्या परताव्याची रक्कम वजा जाता शासनाकडे निव्वळ प्रत्यक्ष कराच्या रूपाने 3 लाख 78 हजार कोटी रुपये जमा झाल्याची आकडेवारी पुढे आली आहे. याखेरीज अग्रीम कराच्या रुपाने 1 लाख 16 हजार कोटी रुपये तिजोरीत जमा झाले. यामध्ये व्यक्तिगत व कार्पोरेट कराचा वाटा अनुक्रमे 23 हजार 513 कोटी व 92 हजार 173 कोटी रुपये इतका आहे.

नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये प्रत्यक्ष कराच्या महसुलामध्ये देशात मुंबई विभाग सर्वप्रथम आहे.

Back to top button