जाहिरातींमुळे आमच्यात दुरावा येणार नाही; जाहिरात वादावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया | पुढारी

जाहिरातींमुळे आमच्यात दुरावा येणार नाही; जाहिरात वादावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

पुढारी ऑनलाईन डेस्क : “एक सरकार घरी बसलं होतं हे सरकार तुमच्या दारी आलं आहे. याआधीच सरकार आपल्या घरी आणि आताच सरकार आपल्या दारी हाच दोन सरकार मधील फरक आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. पालघर येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमात ते बोलत होते. आमचा प्रवास २५ वर्षांचा आहे. पण गेल्या एक वर्षापासून तो अधिक घट्ट आहे. त्यामुळे एखाद्या जाहिरातींमुळे या सरकारमध्ये दुरावा येणार नाही, असेही फडवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.

जाहिरात वादानंतर आज प्रथमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालघर येथील कार्यक्रमात एकत्र आले. यावेळी शिंदे यांनी भाषणाच्या सुरूवातीला महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री असा उल्लेख फडणवीस यांचा केला. तर फडणवीस यांनी देखील भाषणाच्या सुरूवातीला लोकप्रिय मुख्यमंत्री असाच उल्लेख शिंदे यांचा केला.

यावेळी फडणवीस म्हणाले की, आमच्या युतीचा प्रवास २५ वर्षांचा आहे. पण गेल्या एक वर्षापासून तो अधिक घट्ट आहे. आमच्या प्रवासाची कोणीही चिंता करण्याची गरज नाही. तो आजही सोबत आहे आणि उद्याही सोबत राहणार आहे. कारण आम्ही सरकार खुर्च्या तोडण्याकरीता किंवा पद मिळवण्यासाठी तयार केलेले नाही. हे सरकार जनसामान्यांच्या जीवनात सामाजिक व आर्थीक परिवर्तन व सर्वांच्या जीवनात गुणात्मक बदल व्हायला पाहिजे, यासाठी तयार झालं आहे. एका जाहिरातीमुळे या सरकारमध्ये काय होईल एवढे तकलादू हे सरकार नाही. हे जुनं सरकार नाही, कोणी आधी भाषण करायच यावरून भांडणार सरकार आम्ही पाहिलं आहे. हे सरकार सामान्यांकरीता काम करणार आहे. सामान्य माणसांच्या जीवनात परिवर्तन होत नाही तोपर्यंत सरकार काम करत राहिलं, असा विश्वास फडवीस यांनी व्यक्त केला.

महात्मा फुले योजनेअंतर्गत ५ लाखापर्यंत उपचार

महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत १.५ लाखापर्यंत उपचार मोफत दिले जात होते. मात्र आता ५ लाखापर्यंतचे उपचार मोफत दिले जातील. यापुढे कुठल्याही व्यक्तीला सर्व उपचार मोफत करण्याचं काम मोदी सरकार आणि राज्यसरकार करणार आहे, असे यावळी फडणवीस यांनी सांगितले.

ओबीसींसाठी १० लाख घरे

एकही आदीवासी बेघर राहू नये यासाठी घरे बांधण्याची योजना सरकारने हाती घेतली आहे. ओबीसींसाठीही मोदी आवास योजनेअंतर्गंत १० लाख घरे बांधणार आहे. ३ लाख घरे यावर्षीच बांधण्याचा निर्धार केला आहे, अशी घोषणा फडणवीस यांनी यावेळी केली.

Back to top button