WTC Final 2023 : शिवधनुष्य पेलण्यासाठी निग्रहाने टिकण्याची गरज | पुढारी

WTC Final 2023 : शिवधनुष्य पेलण्यासाठी निग्रहाने टिकण्याची गरज

ऑस्ट्रेलिया कसोटीत पहिल्या दिवसापासून भारताच्या पुढे आहे, पण भारताने कुठच्याही क्षणी हा सामना सोडून दिला नाही. वॉर्नर बाद झाल्यावर झोपेतून खडबडून जागा झालेला लॅबुशेन मैदानावर चांगलाच जागा झाला होता तेव्हा त्याला लवकर बाद करणे गरजेचे होते. असखल बाऊन्समुळे लॅबुशेनच्या बॅटइतकेच चेंडू त्याच्या अंगावर लागले. शेवटी एका उत्तम लेंग्थच्या ऑफ स्टम्पच्या रोखाने टाकलेल्या उमेश यादवच्या चेंडूने लॅबुशेनचा मोठा अडथळा दूर केला.  भारताला या सामन्यात टिकून राहण्यासाठी ऑस्ट्रेलियाला 175 च्या आत बाद करणे गरजेचे होते. लॅबुशेन आणि ग्रीनच्या बळींनी हे साध्य होईल असे वाटत असताना कॅरी आणि स्टार्कच्या 93 धावांच्या भागीदारीने सामना पुन्हा भारतापासून दूर नेला. ऑस्ट्रेलियाने 444 धावांचे लक्ष्य भारताला दिल्यावर भारताला गरज होती ती सकारात्मक सुरुवातीची. कसोटीच्या इतिहासात 444 धावांचा पाठलाग करून आजपर्यंत कुणी जिंकलेले नाही तेव्हा हे शिवधनुष्य पेलायला सकारात्मक पवित्रा, योग्य फटक्यांची निवड आणि खेळपट्टीवर टिकून राहायचा निग्रह यांची गरज होती. (WTC Final 2023)
रोहित शर्मा आणि शुभमन गिलने भारताच्या दुसर्‍या डावाची सुरुवात केली तेव्हा त्यांचा सकारात्मक द़ृष्टिकोन सुखावणारा होता. धावांच्या लक्ष्याचे दडपण न घेता संधी मिळेल तेव्हा त्यांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर प्रति आक्रमण केले. शर्मा आणि गिल यांनी पूल, ड्राईव्ह यांचा मुक्त वापर करत धावा जोडल्या. ते दोघे खेळत असताना फलंदाजी किती सोपी असू शकते, असे वाटायला लागते. पाचच्या सरासरीने भारत घोडदौड करत असताना बोलँडच्या ऑफ स्टम्पवरच्या चेंडूला शुभमन गिलच्या बॅटची कड लागली आणि भारताच्या उत्तम सुरुवातीला द़ृष्ट लागली. क्रिकेटमध्ये तंत्रज्ञान वापरायचे असेल तर त्याचा योग्य वापर करणे जरुरीचे आहे. कॅमेरून ग्रीनने शुभमन गिलचा जो झेल घेतला तेव्हा थर्ड अंपायरने ग्रीनचे मधले बोट चेंडूच्या खाली आले ते चेंडू जमिनीला लागून आल्यावर का आधी हे फ्रेम झूम करून का बघितले नाही? थर्ड अंपायरला चेंडू खालीबोट असल्याची इतकी खात्री होती? नंतर दाखवलेल्या रिप्लेमध्ये चेंडूचा जमिनीला स्पर्श झाल्याचे नक्की दिसत होते. तेव्हा गिलचा निर्णय खराब पंचगिरीचा होता. एकंदरीत या महत्त्वाच्या कसोटीत पंचांचा दर्जा सुमार आहे. क्रीजच्या पुढे चार-पाच इंच पाऊल पडलेले नोबॉलही मैदानावरच्या पंचांना दिसले नाहीत. (WTC Final 2023)
रोहित शर्माने पहिल्या डावापेक्षा आपल्या फलंदाजीत केलेला बदल त्याला ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर हुकूमत गाजवायला मदत करत होता. तो क्रिजच्या पुढे उभा राहून गरजेप्रमाणे बॅकफूटवर येऊन उत्तम पूल, ऑन ड्राईव्ह मारत होता. रोहित शर्मा इतक्या सहजतेने आणि आत्मविश्वासाने खेळात होता की त्याला फक्त तोच बाद करू शकत होता आणि नेमके तसेच घडले. नॅथन लॉयन राऊंड द विकेट मारा करत होता. कारण त्याला खेळपट्टीच्या खाचखळग्यांचा फायदा तसेच पायचितचा निर्णय मिळवणे फायद्याचे झाले असते. शॉर्ट फाईन लेग लावून त्याने फसलेला स्वीप झेलायची सोय केली होती. रोहित शर्मा सरळ चेंडूवर पॅडल स्वीप खेळायला गेला आणि फसला. वास्तविक त्याला अ‍ॅक्रॉस किंवा टू आईड स्टान्स घेऊन लेगला तो चेंडू सहज फटकावता आला असता जे नंतर कोहलीने केले. रोहित शर्माची विकेट ही हकनाक होती. भारताच्या पाठलागाच्या द़ृष्टीने हा मोठा धक्का होता. चेतेश्वर पुजारा रोहित शर्माच्या साथीने चेंडू नुसतेच खेळून काढत धावफलक हलता ठेवत होता. भारतीय फलंदाजांनी स्टार्कला निष्प्रभ केले होते. एक बोलँड सोडला तर धोकादायक कुणी वाटत नव्हते. पॅट कमिन्स नो बॉल्सची खैरात करत होता. अशावेळी पुजाराला अपर कट खेळायची अवदसा आठवली आणि आपण दुसरी विकेट बहाल केली. शर्मा आणि पुजाराचे बळी हे गोलंदाजांनी मिळवले नव्हते तर आपण ते खराब फटक्यांनी बहाल केले. कोहली आणि रहाणे जोडीने नाबाद 71 धावांची भागीदारी करून पुन्हा आशा जागवल्या आहेत. आजही हवामान स्वच्छ असणार आहे. खेळपट्टी कोरडी झाली आहे. भारताला जिंकायला 280 धावा हव्या आहेत. आज भारताला गरज आहे ती उत्तम क्रिकेटबरोबर उत्तम मानसिकतेची. शेवटच्या दिवशी 280 धावा करणे किंवा 90 षटके खेळून काढणे हे कठीण नक्कीच आहे, पण भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध गेल्या काही वर्षांत असे चमत्कार केले आहेत. मैदानात ‘गॅबा कसोटीची पुनरावृत्ती ओव्हलला होईल का?’ चा एक बोर्ड दिसत होता. आजच्या पहिल्या सत्रात जर कोहली-रहाणे जोडी टिकून राहिली तरच या आशेवर जगण्याला अर्थ आहे. (WTC Final 2023)

तिसर्‍या पंचांनी ढापली शुभमनची विकेट

दुसर्‍या डावात शुभमन गिलला चुकीच्या पद्धतीने बाद दिल्याने वाद निर्माण झाला आहे. भारताचा धावांचा पाठलाग व्यवस्थित सुरू असताना  भारताला पहिला झटका 41 धावांवर बसला. स्कॉट बोलँडने शुभमन गिलला कॅमेरून ग्रीनकडे झेल देण्यास भाग पाडले. मात्र, ग्रीनच्या या झेलावरून वाद सुरू झाला आहे.  स्लीपमध्ये झेल घेत असताना, चेंडू ग्रीनच्या हातात अडकला आणि तो जमिनीवर घासला, पण तिसर्‍या पंचांनी त्याला आऊट दिले. समालोचन करताना दीप दासगुप्ता आणि हरभजन सिंगही शुभमन नाबाद असल्याचे म्हटले. त्यानंतर चाहतेही खूप संतापलेले दिसत होते. सोशल मीडियावर तिसर्‍या पंचांच्या या निर्णयाविरोधात अनेक मिम्स व्हायरल होत होते.
– निमिष पाटगावकर
हेही वाचा; 

Back to top button