भाजपचं मिशन बारामती : लोकसभा मतदारसंघ प्रमुखपदाची जबाबदारी ‘या’ नेत्यावर | पुढारी

भाजपचं मिशन बारामती : लोकसभा मतदारसंघ प्रमुखपदाची जबाबदारी 'या' नेत्यावर

दौंड (पुणे); पुढारी वृत्तसेवा : भारतीय जनता पार्टीने बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुखपदी आमदार राहुल कुल यांचे गुरुवारी (दि. 8) निवड केली, तर विधानसभा प्रमुख म्हणून आ. राहुल कुल यांचे विश्वासू सहकारी हरिभाऊ ठोंबरे यांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने बारामती लोकसभा मतदारसंघात आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये आपला उमेदवार निवडून आणायचा चंग बांधला आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघ हा शरद पवार यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहत होता. परंतु 2014 च्या निवडणुकीपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घरघर लागली व हळूहळू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बुरूज ढासळू लागला, याचे महत्त्वाचे कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेली मोठ्या प्रमाणातील गटबाजी.

भारतीय जनता पार्टी तशी दौंड तालुक्यात नगण्य होती. त्यांनी गेल्या काही वर्षांत हळूहळू आपले पाय तालुक्यातील विविध सहकारी संस्था व ग्रामपंचायतीमध्ये रोवले. नुकत्याच झालेल्या दौंड कृषी उत्पन्न बाजार समिती गेल्या 30 वर्षांपासून राष्ट्रवादीची एकहाती असलेली सत्ता उलटवण्यात भारतीय जनता पार्टीला विशेषतः आमदार राहुल कुल यांना यश आले. त्यामुळे त्यांचे मनोबलदेखील वाढले.
आता जरी भाजपने एवढी मोठी जबाबदारी आ. राहुल कुल यांच्यावर टाकली असली, तरी राहुल कुल हे आव्हान कसे पेलणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

मागील लोकसभा निवडणुकीमध्ये आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांनी अत्यंत अल्प कालावधीमध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना त्यांच्याच मतदारसंघात जखडून ठेवले होते. कांचन कुल यांचा त्या वेळी पराभव झाला असला, तरी त्यांनी पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवत जोरदार फाईट दिली होती.

सध्या भारतीय जनता पार्टीने मिशन बारामती सुरू केले असले, तरी त्यांना हे तितके सोपे नाही. बारामती लोकसभा मतदारसंघ हा शरद पवार यांना मानणारा आहे. पवार अखेरच्या क्षणी कोणताही चमत्कार करू शकतात, हे भल्याभल्यांना माहिती आहे. त्यामुळे येणार्‍या काळात आ. राहुल कुल त्यांना दिलेली जबाबदारी कशाप्रकारे पेलतात हे पाहणे गरजेचे आहे.

हेही वाचा

सांगली : सातवीतील मुलीवर अत्याचार करून केले लग्न

नाशिक : गुंतवणूकदारांना गंडवणाऱ्या पूजा भोईरच्या पोलिस कोठडीत वाढ

मिरज : दोन ट्रकच्या अपघात एक ठार

Back to top button