पुणे : समाधान अन् कर्तव्यपूर्तीचा रंगला सोहळा | पुढारी

पुणे : समाधान अन् कर्तव्यपूर्तीचा रंगला सोहळा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : घरफोडी, चोरी, लूट अशा गुन्ह्यांमध्ये त्यांचा कष्टाने कमविलेला ऐवज लंपास झाला. तो परत मिळण्याची आशाच संपली होती. पण, पोलिसांनी केलेल्या प्रामाणिक तपासाला यश मिळाले आणि चोरट्यांकडून जप्त केलेला मुद्देमाल संबंधित नागरिकांकडे सुपूर्त करण्यात आला. नागरिकांच्या चेहऱ्यावर आपला दागिना मिळाल्याचे समाधान; तर पोलिस कर्मचारी, अधिकारी यांच्या चेहऱ्यावर कर्तव्यपूर्तीचे समाधान, अशा वातावरणात एक सोहळा शिवाजीनगर पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर पार पडला.

पुणे शहर पोलिस दलातर्फे मुद्देमाल पुनःप्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते 58 नागरिकांना सुमारे 5 कोटी 31 लाख रुपयांचा मुद्देमाल पुनःप्रदान करण्यात आला. या वेळी चांगली कामगिरी करणार्‍या पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांचा प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

पालकमंत्र्यांनी स्वतः पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांचे कौतुक केले. पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, रामनाथ पोकळे, प्रवीणकुमार पाटील, पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल, स्मार्तना पाटील, अमोल झेंडे, सुहेल शर्मा, शशिकांत बोराटे, विक्रांत देशमुख आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले की, पोलिसांच्या कामगिरीमुळे मुद्देमाल मिळालेल्यांना समाधान मिळते आणि जनतेत पोलिसांविषयी चांगला संदेश जातो. पोलिस प्रत्येक गुन्ह्याचा तपास गांभीर्याने आणि परिश्रमपूर्वक करतात. त्यामुळे नागरिकांनी त्यांना सहकार्य करणे, प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. पोलिसांना अद्ययावत शस्त्र, साधने उपलब्ध करण्यासाठी आणि पोलिस वसाहतीच्या दुरुस्तीसाठी 100 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. कर्वेनगरमधील एका ज्येष्ठ महिलेसह स्वारगेटजवळ बांगड्या चोरीस गेलेल्या महिलेने पोलिसांच्या कामाचे कौतुक करत आभार मानले.

पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांचा सन्मान

गुन्ह्यांचा उत्कृष्टरीत्या तपास करणाऱ्या सहायक पोलिस निरीक्षक प्रसाद लोणारे, सचिन निकम, नरेंद्र पाटील, जयंत जाधव, विजयकुमार शिंदे, पोलिस उपनिरीक्षक नीलेश महाडीक, नीलेश मोकाशी, महेंद्र कांबळे, धीरज गुप्ता, लहू सातपुते, अंकुश डोंबाळे, रूपेश चाळके, मोहनदास जाधव, कर्मचारी श्रीकांत भांगरे यांना पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

गुन्हे उघडकीस आल्यावर मुद्देमाल हस्तगत करणे कठीण असते. पोलिस अधिकारी प्रामाणिकपणे आणि परिश्रमपूर्वक हे काम करतात आणि कायदेशीर बाबी पूर्ण करून मुद्देमाल फिर्यादींना हस्तांतरित केला जातो. त्यासाठी न्यायालयीन प्रक्रियेतून जावे लागते. त्यामुळे चांगली कामगिरी करणारे पोलिस अधिकारी अभिनंदनाला पात्र आहेत.

                                         रितेश कुमार, पोलिस आयुक्त

Back to top button