शिर्डी : ‘समृद्धी’चा दुसरा टप्पा ‘सुवर्ण त्रिकोण’ठरेल! मंत्री विखे | पुढारी

शिर्डी : ‘समृद्धी’चा दुसरा टप्पा ‘सुवर्ण त्रिकोण’ठरेल! मंत्री विखे

शिर्डी; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राला समृध्द करणार्‍या हिंदूहृदय सम्राट महाराष्ट्र समृध्दी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर या 80 कि. मी. लांबीचा दुसरा टप्पा म्हणजे उत्तर महाराष्ट्राच्या विकासाचा मानबिंदू ठरेल, असा विश्वास महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी व्यक्त केला. पश्चिम व उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा व विदर्भाला जोडला जाणारा विकासाचा हा ‘सुवर्ण त्रिकोण’ ठरणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. समृध्दी महामार्गावरील नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झाले होते. या मार्गामुळे प्रवासाचा वेळ वाचण्याचा सुखद अनुभव सर्वांना मिळाला.

आता या महामार्गाच्या दुसर्‍या टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होत आहे. अ. नगर जिल्ह्याच्या विकासात्मक दृष्टीने ही ऐतिहासिक घटना आहे. समृध्दी महामार्गाचे काम वेगाने पुढे जात आहे. त्याच पध्दतीने जिल्ह्याच्या विकासालाही या मार्गामुळे गती मिळेल, असे सांगत मंत्री विखे म्हणाले, पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकार्याने मुंबई ते शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे सुरु झाली. आता समृध्दी महामार्गाच्या दुसर्‍या टप्प्याची होत असलेली सुरुवात जिल्ह्याच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्वपूर्ण बाब ठरेल, असे ते म्हणाले.

दुसर्‍या टप्प्यातील या महामार्गाचा लाभ सिन्नर येथील गोंदे इंटरचेंज येथून नाशिक, अ. नगर, पुणे जिल्ह्यांसह त्या गावातील नागरीकांना मोठा उपयोग होईल. घोटीपर्यंतचे अंतर कमी होणार आहे. या भागातील शेतकर्‍यांच्या शेत मालाची वाहतूक अतिशय कमी वेळेत होईल, याकडे लक्ष वेधून या महामार्गाची अ. नगर जिल्ह्याची लांबी 29.40 कि. मी. एवढी आहे. शिर्डी व अ.नगर परिसरातील कृषी उद्योगांसह इतर व्यवसायांना चालना मिळून रोजगार वृध्दीच्यादृष्टीने या महामार्गावरील दळणवळण उपयुक्त ठरणार आहे. भविष्यात लवकरच या भागात लॉजेस्टीक पार्क, आयटी पार्क व शेतीपुरक उद्योग उभारणीसाठी महत्वपूर्ण निर्णय होणार आहे. जिल्ह्यातील औद्योगिक विकासासाठी समृध्दीचे मोठे सहकार्य होणार असल्याचे ते म्हणाले.

खा. डॉ. सुजय विखे यांनी केल्या सूचना..!

खा. डॉ. सुजय विखे पा. यांनी आज (गुरुवारी) अधिकार्‍यांसमवेत समृद्धी महामार्गाच्या दुसर्‍या टप्प्यातील उद्घाटन स्थळाची पहाणी करुन, कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत अधिकार्‍यांना सुचना दिल्या. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्यासह रस्ते विकास व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Back to top button