Hupari Municipal Council : हुपरीचे उपनगराध्यक्ष भरत लठ्ठेंविरुद्ध अविश्वास ठराव दाखल | पुढारी

Hupari Municipal Council : हुपरीचे उपनगराध्यक्ष भरत लठ्ठेंविरुद्ध अविश्वास ठराव दाखल

रेंदाळ (कोल्हापूर); संजय साळुंखे : Hupari Municipal Council : हुपरी नगरपरिषदेचे भाजपचे उपनगराध्यक्ष भरत लठ्ठे यांना पदावरून हटवण्यासाठी गुप्त हालचालींना वेग आला होता. अखेर भाजप-ताराराणी आघाडी व शिवसेना असे 12 सदस्य एकत्रित येऊन उपनगराध्यक्ष लठ्ठे यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव दाखल करत असल्याचे पत्र नगराध्यक्षा जयश्री गाट यांना दिले. त्या मागणीनुसार 25 ऑक्टोबर रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

लोकलढ्यातून स्थापन झालेल्या नगरपरिषदेच्या पहिल्या निवडणुकीत कोण बाजी मारणार ही उत्सुकता होती. यामध्ये भाजप नगराध्यक्षासह 8, ताराराणी आघाडी 5, अपक्ष 2, मनसे 2, शिवसेना 2 असे सदस्य निवडून आले. भाजपकडे पुरेसे संख्याबळ असल्याने त्यांनी सत्ता स्थापन केली. ताराराणी आघाडीने नेत्यांच्या आदेशानुसार सत्ताधारी भाजप सोबत राहण्याचा निर्णय घेतला.

नगरपरिषदेच्या पहिल्या उपनगराध्यक्षपदी एक वर्षासाठी जयकुमार माळगे यांना संधी मिळाली. त्यांच्या राजीनाम्यानंतर भरत लठ्ठे याना संधी मिळाली. त्यावेळी उपनगराध्यक्ष व भाजप पक्षप्रतोद अशा दोन्ही जबाबदाऱ्या त्यांच्याकडे होत्या. ठरल्याप्रमाणे कार्यकाळ संपल्यानंतरही लठ्ठे यांनी राजीनामा देण्यास उदासीनता दाखवली. वरिष्ठ नेत्यांनी विनंती करूनही राजीनामा न दिल्याने सदस्य व लठ्ठे यांच्यात वादाची ठिणगी पडून दुरावा निर्माण झाला.

पक्षप्रतोद पद त्यांच्याकडे असल्याने पुरेसे संख्याबळ असूनही उपनगराध्यक्ष पदावरून हटवण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या. सदस्य व लठ्ठे यांच्यातील दरी वाढतच गेली. बहुमताने भाजप पक्षप्रतोद काढून घेऊन रफिक मुल्ला यांची निवड करण्यात आली. लठ्ठे यांना पदावरून हटवण्यासाठी कांही दिवसापासून गुप्त हालचाली सुरू होत्या. अखेर भाजपचे नेते महावीर गाट व ताराराणी आघाडीचे जि. प. सदस्य राहुल आवाडे यांच्या आदेशानुसार भाजप, ताराराणी आघाडी व शिवसेना अशी मोठ बांधून 12 सदस्यांनी उपनगराध्यक्ष लठ्ठे यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव दाखल केला. मागणी पत्रानुसार नगराध्यक्षानी 25 ऑक्टोबर रोजी विशेष सभा बोलवण्यात आली असून या सभेकडे शहराचे लक्ष लागून राहिले आहे.

25 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विशेष सभेत दगा फटका होऊ नये यासाठी भाजप व ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांना व्हीप आदेश लागू करण्यात आला आहे. त्याचबरोबर त्यांना सहलीला पाठवण्यात आले आहे. यामध्ये शिवसेनेच्या पक्षप्रतोद यांचाही समावेश आहे.

Back to top button