”महाविकास आघाडी म्हणून व्यवस्थित सामोरे गेलो, तर लोकसभेच्या 40 जागा जिंकू”; बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला विश्वास | पुढारी

''महाविकास आघाडी म्हणून व्यवस्थित सामोरे गेलो, तर लोकसभेच्या 40 जागा जिंकू''; बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला विश्वास

संगमनेर (नगर), पुढारी वृत्तसेवा: महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप तरी ठरलेला नाही. परंतु, आम्ही लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून तीनही पक्ष एकत्रित येऊन लढणार आहोत. आम्ही सर्वजण महाविकास आघाडी म्हणून व्यवस्थित सामोरे गेलो, तर 48 पैकी कमीत कमी 40 जागा जिंकू असा विश्वास काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

हक्कभंग प्रस्ताव आणण्याच्या बाबतीमध्ये फक्त संजय राऊत बोलतात असे नाही. भाजप नेते ज्या पद्धतीने एकदम पातळी सोडून बोलतात, त्यामुळे दुसऱ्या बाजूनेही काही तरी होत असते. त्यामुळे प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी भाषणे करताना आपल्या भाषणाची लेव्हल सुधारणे गरजेचे आहे.

भाजप नेते समाजामध्ये वाद लावून तेढ निर्माण करतात आणि त्यातून आपली मताची पोळी भाजून घेण्याचे काम करत आहेत. महाराष्ट्रात दोन समाजामध्ये वाद लावण्याचे काम भाजप नेते जाणीवपूर्वक करत आहेत. हिंदू धर्मियांचे मते आपल्याकडे ओढण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे, तसा त्यांनी प्रयत्न कर्नाटक निवडणुकीच्या वेळी बंगलोरमध्ये केला. बजरंग बलीच्या नावाने मतं मागितली. परंतु, बजरंग बलीने मात्र कौल काँग्रेसच्या बाजूने दिला आहे. त्यामुळे भाजपचे आता येथुन पुढे काहीही चालणार नाही, असं देखील बाळासाहेब थोरात म्हणाले.

Back to top button