हनीट्रपच्या नागपूर कनेक्शनमध्ये निखिल शेंडे निर्दोष? कुटुंबियांनी व्यक्त केला विश्वास | पुढारी

हनीट्रपच्या नागपूर कनेक्शनमध्ये निखिल शेंडे निर्दोष? कुटुंबियांनी व्यक्त केला विश्वास

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : पुण्यातील डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन संस्थेचे संचालक प्रदीप कुरूळकर यांना हनी ट्रॅपमध्ये अडकल्यानंतर निलंबित करण्यात आले. आता या प्रकरणाचे कनेक्शन नागपूरपर्यंत असल्याचे पुढे आले आहे. नागपुरातील मूळ रहिवासी असलेला आणि सध्या बंगळुरूत हवाई दलात असलेल्या निखिल शेंडेचे नाव यात पुढे आलेले आहे. कुटुंबियांनी मात्र निखिल अशा कामात राहूच शकत नसल्याचा दावा केला आहे.

कुरुळकर देशाची गोपनीय, संवेदनशील माहिती बाहेर देत असल्याचे सिद्ध झाल्यानंतर डीआरडीओच्या संचालक पदावरून हटविण्यात आले. गुप्तचर यंत्रणांकडून माहिती मिळाल्यानंतर डीआरडीओने तपास सुरू केला. या तपासात कुरळकर पाकिस्तानी गुप्तहेरांच्या संपर्कात असल्याचे पुढे आल्याने देशात खळबळ उडाली. आता याच प्रकरणी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेने हनी ट्रॅपमध्ये अडकविण्याचे प्रयत्न केल्याच्या आरोपात चौकशीच्या फेऱ्यात असलेला हवाई दलातील शिपाई निखिल मुरलीधर शेंडे हा मूळ नागपूरचा असून पूर्व नागपुरातील शांतीनगर परिसरात निखिलचे आई आणि काका राहतात. या संदर्भातली बातमी वाचून आम्हाला धक्काच बसल्याचे निखिलच्या कुटुंबीयांचे मत आहे. स्पोर्ट्स कोट्यामधून हवाई दलात गेलेले निखिल शेंडे उत्तम धावपटू आहे. निखिलच्या मोबाईलवरून कुरूळकर यांना मेसेज आला होता की, ‘माझा मोबाईल का ब्लॉक केला’, त्यानंतर निखिलची चौकशी सुरू झाली. दरम्यान निखिल हा निर्दोष असून त्यांना केवळ चौकशीसाठी बोलावले व नंतर सोडण्यात आले या प्रकरणाशी निखिलचा संबंध नसल्याचा दावा त्याच्या आईने केला आहे. दरम्यान, निखिलचा फोन नंबर या प्रकरणात कसा आला, हे त्यालाही माहिती नाही. पुण्यामध्ये त्याला चौकशीसाठी नेले, चौकशी झाली. पण त्यामध्ये तपास अधिकाऱ्यांना काहीही आढळले नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनी निखिलला तेव्हाच सोडून दिले, असे निखिलच्या आईने सांगितले. आमचा निखिलवर पूर्ण विश्‍वास आहे. तो निर्दोष आहे आणि सध्या बंगळूरला आपल्या कर्तव्यावर आहे, असे त्याचे काका म्हणाले. कुरुळकर २०२२ पासून पाकिस्तानी गुप्तहेरांच्या संपर्कात असल्याचे आढळून आल्यानंतर महाराष्ट्र एटीएसने गोपनीय कायद्यांतर्गत पुण्यातून अटक केली. कुरुळकरने आपल्या पदाचा गैरवापर केला आणि देशाशी संबंधित संवेदनशील माहिती लीक केल्याने मुंबई एटीएसच्या काळाचौकी युनिटमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : 

Back to top button