चंद्राचा ‘द व्हिन्सी ग्लो’ बघा चालू आठवड्यातच! .. 15 व्या शतकात उलगडले घटनेचे रहस्य | पुढारी

चंद्राचा ‘द व्हिन्सी ग्लो’ बघा चालू आठवड्यातच! .. 15 व्या शतकात उलगडले घटनेचे रहस्य

नवी दिल्ली; वृत्तसंस्था :  चंद्राची ‘द व्हिन्सी ग्लो’ नावाने ओळखली जाणारी एक विशिष्ट कला या आठवड्यात पृथ्वीवरून बघायला मिळणार आहे. अर्थशाईन असेही या घटनेला म्हणतात. चंद्राच्या अंधारल्या बाजूची चमक, असेही आपण या घटनेचे वर्णन करू शकतो. पृथ्वीवरील प्रकाशाचे चंद्राकडून परावर्तन होते आणि हेच या खगोलीय घटनेचे रहस्य आहे. या घटनेचे नामकरण लियोनार्दो द व्हिन्सी या चित्रकार-संशोधकाच्या नावावर करण्यात आले आहे.

व्हिन्सी यांनीच पहिल्यांदा पंधराव्या शतकात ही घटना उलगडली होती. चालू आठवड्यात सायंकाळनंतरच्या आकाशात चंद्राचे हे विहंगम रूप आपण बघू शकतो. सूर्यास्ताच्या वेळी चंद्र वर्धमान असताना चंद्राचा अंधारलेला भाग ढगासारखा दिसतो. कडेला प्रकाश दिसतो. हा प्रकाश पूर्ण चंद्राच्या तुलनेत अधिक असतो, हे विशेष! आणि हा प्रकाश म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून, पृथ्वीवरील प्रकाशाचे चंद्रावरून झालेले परावर्तन होय!

चंद्राचे द व्हिन्सी रूपडे बघण्यासाठी हे दिवस उत्तम

रविवार (21 मे), सोमवार (22 मे) आणि मंगळवार (23 मे) हे द व्हिन्सी रूपडे पाहण्यासाठी उत्तम दिवस आहेत.
सूर्यास्तानंतर तासाभराने आकाशात हे द़ृश्य बघण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी विशिष्ट उपकरणाचीही गरज नाही.

Back to top button